सराईत बुलेट चोर पोलिसांच्या जाळ्यात

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन- बहिणीला भेटण्यासाठी आलेल्या सराईत बुलेट चोरला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने सापळा रचून अटक केली. ही कारवाई काळेवाडी येथील धनगर बाबा मंदिराजवळ करण्यात आली. तुषार भगवान अंबिलढगे (वय १९, रा. चिंचपूर पांगुळ, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

गुन्हे शाखा युनिट दोनचे पथक वाकड परिसरात गस्त घालत असताना पोलीस नाईक मोहम्मद गौस नदाफ यांना माहिती मिळाली की, एक बुलेट चोर काळेवाडी येथील धनगर बाबा मंदिराजवळ त्याच्या बहिणीला भेटण्यासाठी येणार आहे. त्याच्याकडे चोरीची बुलेट आहे. त्यानुसार पोलिसांनी धनगर बाबा मंदिर परिसरात सापळा रचून आरोपी तुषार याला पकडले. त्याच्याकडे असलेल्या बुलेट बाबत चौकशी केली असता ती चोरीची असल्याचे समजले. त्यावरून त्याला अटक करण्यात आली. त्याने ही बुलेट वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले असून याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात वाहन चोरीचा गुन्हा दाखल आहे. आरोपी तुषार याला यापूर्वी वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करून त्याच्याकडून २२ रॉयल इन्फिल्ड बुलेट जप्त केल्या होत्या.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, सहाय्यक पोलीस फौजदार निकम, पोलीस कर्मचारी नदाफ, मुल्ला, आढारी, तांबोळी यांच्या पथकाने केली. सहाय्य्क पोलीस निरीक्षक सतीश कांबळे तपास करीत आहेत.