दिवसा घरफोड्या करणारा सराईत पुणे पोलिसांच्या जाळ्यात, 20 गुन्ह्यातील 29 लाखांचा ऐवज जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरात दिवसा घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या कोंढवा पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी त्याच्याकडून 20 गुन्ह्यांतील तब्बल 28 लाख 80 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये 10 लाख रुपयांची रोकड आणि 18 लाख 80 हजार रुपये किंमतीचे 470 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी ही कारवाई भीमा कोरेगाव येथे केली.

निलेश अंकुश काळे असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. तर त्याच्याकडून चोरीचे दागिने खरेदी करणाऱ्या चाकण येथील समर्थ ज्वेलर्सचे मालक प्रशांत दत्तात्रय बागडे याला अटक केली आहे. आरोपी निलेश काळे याने कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 10, भारती विद्यापीठ 3, सहकारनगर 2, सिंहगड रोड, हवेली, हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी 1 आणि खेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 असे 20 गुन्हे केल्याचे तपासात उघड झाले आहे.

असा केला तपास
भरदिवसा पुण्यामध्ये घरफोडीचे प्रमाण वाढले होते. या गुन्ह्यांच्या तपास करत असताना पोलिसांनी 200 ते 250 सीसीटीव्ही तपासले. यामध्ये एक इसम चालत येऊन घरफोडी करून काही अंतरावर उभ्या केलेल्या दुचाकीवरून पसार होत असल्याचे दिसत होते. तसेच तो एकाच मार्गाचा वापर करत असल्याचे तपासात समोर आल्यानंतर पोलिसांनी येरवडा जेलमधून सुटलेल्या गुन्हेगारांचे रेकॉर्ड तपासले. यामध्ये दिवसा घरफोडी करणारा निलेश काळे असल्याचे स्पष्ट झाले. त्याचा शोध घेऊन त्याला भीमा कोरेगाव येथून अटक करण्यात आली.

अशी करत होता चोरी
आरोपी निलेश काळे हा ज्या सोसायट्यांमध्ये सुरक्षा रक्षक नाही अशाच सोसायट्यांमध्ये चोरी करीत होता. सुरक्षा रक्षक नसलेल्या सोसाट्यांमधील बंद घराचा दरवाजा कटावणीने तोडून घरातील दागिने आणि रोकड चोरून नेत होता. आरोपीने सर्व गुन्हे सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत केले असून या वेळेत मुलांना शाळेत सोडण्याची व नमाजाची वेळ असते. या संधीचा फायदा घेऊन त्याने 20 घरफोड्या केल्याचे उघडकीस आले आहे.

ही कारवाई पुर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त सुनिल फुलारी, परिमंडळ 5 चे पोलीस उपायुक्त सुहास बावचे, वानवडी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सुनिल कलगुटकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे, पोलीस निरीक्षक गुन्हे महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा तपास पथकाचे API चेतन मोरे, PSI संतोष शिंदे, ASI इकबाल शेख, पोलीस नाईक सुशील धिवार, पृथ्वीराज पांडुळे, निलेश वनवे, उमाकांत स्वामी, योगेश कुंभार, संजीव कळंबे, पोलीस शिपाई किरण मोरे, किशोर वळे, जोतीबा पवार, अजिम शेख, उमेश शेलार, आदर्श चव्हाण, अमित साळुंके यांनी केली.

Visit : Policenama.com