Coronavirus : ‘कोरोना’वरील उपचार शोधला, ‘औषध’ 100 % ‘परिणामकारक’, अमेरिकन कंपनीचा दावा

नवी दिल्ली : एका अमेरिकन कंपनीने दावा केला आहे की, त्यांनी कोरोना व्हायरसवरील उपाय शोधला आहे. फॉक्स न्यूजच्या रिपोर्टनुसार, कॅलिफोर्नियाची बायोटेक कंपनी सोरेंटो थेराप्यूटीक्सने म्हटले आहे की, आम्ही एसटीआय-1499 नावाचे अँटीबॉडी तयार केले आहे.

कंपनीने म्हटले की, पेट्री डिशच्या प्रयोगात समजले की, एसटीआय-1499 अँटीबॉडी कोरोना व्हायरसला मानवी शरीरातील पेशींमध्ये पसरण्यास शंभर टक्के प्रतिबंध करते.

सोरेंटो कंपनी न्यूयॉर्कच्या माऊंट सिनई स्कूल ऑफ मेडिसीन सोबत एकत्रितपणे अँटीबॉडी तयार करत आहे. अनेक अँटीबॉडी एकत्र करून औषधाचे कॉकटेल तयार करण्याची योजना आहे.

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, सोरेंटो कंपनीने एक प्रेसनोट काढली असून यात म्हटले आहे की, ते एक महिन्यात अँटीबॉडीचे 2 लाख डोस तयार करू शकतात. कंपनीने एसटीआय-1499 अँटीबॉडीच्या वापराच्या परवानगीसाठी अमेरिकेच्या फुड अँड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशनकडे अर्ज केला आहे. कंपनीने इमर्जन्सी आधारावर मंजूरी मागितली आहे.

या बातमीनंतर कंपनीच्या शेयरमध्ये 220 अंकाची वाढ झाली आहे. सोरेंटोचे सीईओ डॉ. हेन्री यांनी फॉक्स न्यूजला सांगितले की, आमचे म्हणणे आहे की, यावर उपाय आहे. हा उपाय शंभर टक्के परिणामकारक आहे.

सीईओ डॉ. हेन्री म्हणाले, जर तुमच्या शरीरात व्हायरसला न्यूट्रलाईज करण्यासाठी अँटीबॉडी असेल तर तुम्हाला सोशल डिस्टन्सिंगची गरज नाही. कोणत्याही भितीशिवाय प्रतिबंध हटवले जाऊ शकतात.

परंतु, या अँटीबॉडीची टेस्ट लॅबमध्ये मानवी पेशींवर करण्यात आली आहे. मानवावर याचे थेट परिक्षण करण्यात आलेले नाही. तसेच या अँटीबॉडीचा साईड इफेक्ट सध्या माहित नाही. तसेच मानवी शरीरात हे औषध कसे वर्तन करेल हेदेखील अद्याप समलेले नाही.