उंटाला डिवचने बेतले जीवावर, १५ वर्षीय युवकाचा मृत्यू

परभणी :  पोलीसनामा ऑनलाईन – परभणीत सय्यद शाह तुराबुल हक रहे दर्ग्याची उरूस यात्रा सुरु आहे. मात्र यंदा या यात्रेला गालबोट लागले आहे. या यात्रेदरम्यान उंटाला डिवचने तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. उंटाला वारंवार दोरी ओढून त्रास दिल्यामुळे उंटाच्या हल्ल्यात १५ वर्षीय समीर इनामदार चा मृत्यू झाला आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, परभणीच्या सय्यद शाह तुराबुल हक रहे दर्ग्याची उरूस यात्रा सुरु आहे. यात्रेदरम्यान विविध भक्त दर्ग्यापर्यंत संदल काढतात. या संदलमध्ये उंट, घोड्यांचाही सहभाग असतो. दर्ग्याचे भक्त शेख समद, शेख गफूर यांनी संदल आयोजित केला होता. हा संदल शहरातील जनता मार्केटजवळ आला असताना १५ वर्षांच्या समीर इनामदारने संदलमधील उंटाची दोरी ओढली. अनेक वेळा दोरी खेचल्याने उंट बिथरला आणि त्याने थेट समीरचा गळा धरला.

या घटनेनंतर एकाच खळबळ उडाली. संदल मिरवणुकीत सहभागी असलेल्या इतर भाविकांनी उंटाच्या तावडीतून समीरची सुटका केली. त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं, मात्र त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर मुलाच्या वडिलांनी पोलिसांनी जबाब दिला असून त्यानुसार नानल पेठ पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याशिवाय उंट आणि उंट मालक विलास खरात यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.