एक व्यक्तीला 2 वेगवगळ्या व्हॅक्सीनचे डोस दिले जाऊ शकतात? आरोग्य मंत्रालयाने दिली ‘ही’ माहिती, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरानाची सध्या असलेली स्थिती, तिसर्‍या लाटेबाबत सरकारचे सुरू असलेले प्रयत्न आणि लसीकरण याबाबत माहिती देण्यासाठी शनिवारी आरोग्य मंत्रालयाने एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल यांनी एकाच व्यक्तीला दोन वेगवेगळ्या व्हॅक्सीनचे डोस देण्यासंदर्भातील महत्वाचे वक्तव्य केले.

डॉ. पॉल म्हणाले, एका व्यक्तीला पहिला डोस एका व्हॅक्सीनचा आणि दुसरा डोस इतर व्हॅक्सीनचा देणे हे शास्त्रीय आणि सैद्धांतिक दृष्ट्या शक्य आहे. परंतु याची शिफारस करणे सध्या ठीक नाही, कारण ही स्थिती आता विकसित होत आहे. अजून याबाबत ठोस मापदंड नाहीत आणि येत्या काळातच याबाबत समजू शकते.

तिसरी लाट आणि मुलांना असलेल्या धोक्यासंदर्भात केंद्र सरकारने शनिवारी म्हटले की, मुले कोविड-19 संसर्ग पसरवू शकतात. परंतु त्यांना जवळपास नेहमीच हलका संसर्ग होत असतो आणि त्यांच्यात मृत्यूदर सुद्धा अतिशय कमी असतो. तत्पूर्वी डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले की, अशा कोणत्याही स्थितीला तोंड देण्यासाठी आरोग्य सुविधा सातत्याने चांगल्या केल्या जात आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले की, सकारात्मकता दर कमी होण्यासह देशात कोविड-19 महामारीची स्थिती सुद्धा नियंत्रणात येत आहे. यासोबतच दैनिक आणि सक्रिय प्रकरणांची संख्या सुद्धा कमी होत आहे. मंत्रालयाने सांगितले की, 10 मे रोजी सकारात्मकता दर 24.83 टक्के होता जो 22 मे रोजी 12.45 टक्के वर आला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी म्हटले की, सात राज्य अशी आहेत जिथे रोज 10 हजारपेक्षा जास्त प्रकरणे समोर येत आहेत आणि सहा राज्यांमध्ये हा आकडा पाच ते दहाच्या दरम्यान आहे. सहा राज्यात कोरोनाने होणार्‍या मृत्यूंचा आकडा जास्त आहे. यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडु, उत्तर प्रदेश, पंजाब आणि दिल्ली आहे.