Coronavirus : ‘कोरोना’वर मात करण्यासाठी व्हिटॅमिन ‘डी’ उपयुक्त ? वैज्ञानिकांना मिळाले आश्चर्यकारक परिणाम, जाणून घ्या

लंडन :  वृत्तसंस्था –  कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगभरात 1 लाख 60 हजारापेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर 20 लाखापेक्षा अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. पाच महिन्यांपूर्वी या धोकादायक विषाणूने चिनचा दरवाजा ठोठावला होता. परंतु अद्याप जगातील कोणत्याही शास्त्रज्ञाला यावर लस तयार करण्यात यश आलेले नाही. दरम्यान, कोरोनाविरुद्धच्या लढाईत शास्त्रज्ञांना व्हिटॅमिन डीच्या वापरामुळे चांगले परिणाम मिळाले आहेत.

व्हिटॅमिन डीचा फायदा होत आहे का ?

ब्रिटिश वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, स्पॅनिश शास्त्रज्ञ सध्या व्हिटॅमिन डीवर संशोधन करत आहेत. व्हिटॅमिन डीच्या वापराने कोरोनाचा पराभव होऊ शकतो की नाही हे शोधण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात आहे. ही दहा आठवड्यांची चाचणी असून कोरोनाबाधित 200 रुग्णांवर केली जात आहे. व्हिटॅमिन डी सुर्य प्रकाशापासून तयार होते. शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की यामुळे मानवाची प्रतिकारशक्ती वाढते.

व्हिटॅमिन डीचा रुग्णांना झाला फायदा

डब्लिन येथील ट्रिनिटी कॉलेजमध्ये नुकत्याच झालेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, व्हिटॅमिन डीचा पूरक आहार घेतल्यास छातीत होणारे संक्रमण 50 टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे. ससेक्स युनिव्हर्सिटीचे डॉक्टर मॅकिओची म्हणतात की, एखाद्या व्यक्तीमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता असल्यास त्याला सर्दी होण्याचा धोका तीन ते चार पट वाढतो. अशा परिस्थितीत, शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असल्यास कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता असते. कोरोना सामान्यत: श्वसन क्रियेवर हल्ला करतो आणि रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो.

व्हिटॅमिन डीचे आणखी काही फायदे

शरीरात व्हिटॅमिन डी नसल्याने केस कोरडे होऊ शकतात. केस मऊ करण्यासाठी व्हिटॅमिन डी घेणे खूप आवश्यक आहे. हे जिवनसत्व नैसर्गिकरित्या आपल्या शरीरात तयार होते आणि हे आपल्या शरिरासाठी खूप महत्त्वाचे आहे. याची कमतरता दूर करण्यासाठी अंडी आणि मासे खावेत. आपल्या आहारात चीज, टोफू, सोया दूध आणि मशरुम समाविष्ट करणे आवश्यक आहे.