प्रवाशांची वाट पाहणाऱ्या कारचालकाला लुबाडले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – प्रवाशांची वाट पाहात थांबलेल्या कारचालकाला मारहाण करत दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी मोबाईल व रोख रक्कम असा ११ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास पुणे सातारा रस्त्यावरील हॉटेल पंचमीसमोर घडली.

याप्रकरणी अनोळखी दुचाकीचालकांविरोधात दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरज इरन्ना शहाबडे (वय २१, धनकवडी, मुळ सोलापूर) यांने यासंदर्भात फिर्याद दिली आहे.

सुरज इरन्ना हा मुळचा सोलापूरचा राहणारा आहे. त्याने नुकतीच बीकॉमची परीक्षा दिली आहे. त्यानंतर त्याला सुट्ट्या असल्याने तो काम करण्यासाठी पुण्यात आला होता. त्याने पुण्यात उबेरची कॅब चालविण्यासाठी घेतली होती. दरम्यान, तो सोमवारी पहाटेच्या सुमारास पंचमी हॉटेल चौकात प्रवाशांची वाट पाहात उभा होता. दरम्यान, त्यावेळी दुचाकीवरून दोघेजण तेथे आले. त्यांनी सुरज इरन्नाला मोटारीतून खाली उतरण्यास सांगितले. ते मोटारीतून खाली उतरल्यावर दोघांनी त्यांना धक्का देत खाली पाडले. आणि त्यांच्या खिशातील रोख ८३० रुपये आणि मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक के. डी. संकपाळ हे अधिक तपास करत आहेत.