कार-रिक्षाचा भीषण अपघात, CNG टाकीच्या स्फोटात चौघांचा जागीच मृत्यू

कर्जत : पोलीसनामा ऑनलाईन – भरधाव हुंदई कार आणि रिक्षाचा भीषण अपघातात CNG टाकीचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, काही कळण्याच्या आत दोन्ही वाहनांनी पेट घेतला. स्फोटात चौघांचा जागीच मृत्यू झाला. कर्जत-नेरळ रोडवर डिकसळ येथे सोमवारी (दि. 29) दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. अपघातात दोन्ही वाहन जळून खाक झाली आहे.

प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास महामार्गावरून जात असताना अचानक रिक्षा हॉस्पिटलकडे वळला. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या भरधाव हुंदई कारने मागून रिक्षाला जोरात धडक दिली. कारच्या धडकेत रिक्षातील CNG सिलेंडरचा स्फोट झाला. त्यामुळे अचानक दोन्ही वाहनांनी पेट घेतला. मदतीसाठी कुणीही पुढे आले नाही. यात 2 महिला, 1 लहान मुलगा आणि 1 पुरुष अशा चौघांचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाची गाडी पोहोचली पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. तात्काळ मदत मिळाली असती तर जीव वाचू शकले असते, असे स्थानिक लोकांनी सांगितले. अपघातातील रिक्षा ही कल्याण येथील असल्याची माहिती मिळाली आहे. पण अपघातग्रस्त कार आणि मृतांची नावे समजू शकली नाहीत.