आलिशान मोटारिंचे शोरुम फोडून चोरी करणाऱ्यांना अटक, हिंजवडी पोलिसांकडून गंभीर स्वरूपाचे 12 गुन्हे उघड

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गालगत असलेल्या आलिशान मोटारी ऑडी, टोयोटा, मारुती सुझुकीच्या शोरुमसह १२ ठिकाणी चोऱ्या करणाऱ्या सराईत टोळीतील तिघांना हिंजवडी पोलिसांच्या तपासी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून २ लाख २५ हजार २०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आलेला आहे.

नारायण जालिंदर कानडे (२१, रा. बावधन, ता. मुळशी), रोहित शिंदे, प्रसाद शिंदे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी चोरी करणा-या सराईत गुन्हेगार नारायण याला हिंजवडी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने त्याचे प्रसाद शिंदे, निखिल थोरात, रोहित शिंदे, किरण बोत्रे, इम्रान सय्यद आणि एक महिला यांच्या मदतीने हिंजवडी परिसरात १२ ठिकाणी चोरी केली आहे. त्यानुसार, त्याला अटक करून त्याचे दोन साथीदार रोहित आणि प्रसाद या दोघांना अटक केली आहे.

बावधन परिसरात, बेंगलोर-मुंबई महामार्गावर असलेले टोयोटा शोरूम, ऑडी शोरूम, मारुती सुझुकी शोरूम अशा १२ ठिकाणी चोरी केली आहे. अटक केलेल्या चोरट्यांकडून एक लॅपटॉप, पॉवर बँक, २०४ किलो पॉलीकॅब वायर, २६ तांब्याचे नळ, एक टॅब, दोन कॅमेरा, एक तिजोरी, टीव्ही असा एकूण दोन लाख २५ हजार २०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या कारवाईमुळे हिंजवडी पोलीस ठाण्यातील १२ गुन्ह्यांची उकल झाली आहे. आरोपी चोरट्यांवर यापूर्वी सिंहगड, पौड, हिंजवडी, चंदननगर, भारती विद्यापीठ, लोणीकंद पोलीस ठाण्यांमध्ये सात गुन्ह्यांची नोंद आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, विनायक ढाकणे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय जोगदंड, पोलीस उपनिरीक्षक अनिरुद्ध गिझे, वरुडे, महेश वायबसे, पोलीस कर्मचारी बाळकृष्ण शिंदे, किरण पवार, नितीन पराळे, अतिक शेख, कुणाल शिंदे, विवेक गायकवाड, हनुमंत कुंभार, रितेश कोळी, सुभाष गुरव, अमर राने, झनकसिंग गुमलाडू, श्रीकांत चव्हाण, चंद्रकांत गडदे, विकी कदम, अली शेख, आकाश पांढरे यांच्या पथकाने केली.

Visit : Policenama.com