युवक राष्ट्रवादीकडून शिवसेनेला दुतोंडी सापाचे व्यंगचित्र भेट

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – भाजप शिवसेना  युतीवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात देखील नाराजी पाहायला मिळत आहे. यापूर्वी शिवसेनेने वारंवार स्वबळाचा नारा देऊन देखील अखेर शिवसेना भाजप युती झाल्यामुळे सांगली येथील युवक राष्ट्रवादीने  मंगळवारी सकाळी दुतोंडी सापाचे व्यंगचित्र भेट करून युती संदर्भात नाराजी व्यक्त केली आहे. युवक राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस यांनी सूरज चव्हाण यांनी व्यंगचित्र तयार करून प्रेमसहीत ते उद्धव ठाकरेंना पाठविल्याचे एका चित्रफीतीत म्हटले आहे. सोशल मिडियावर हे व्यंगचित्र व व्हिडिओ राष्ट्रवादीने व्हायरल केले आहे.

उद्धव ठाकरे यांची ही भूमिका दुतोंडी सापासारखी
सूरज चव्हाण यांनी म्हटले आहे की, गेली चार वर्षे शिवसेनेने सत्तेत असूनही विरोधाची भूमिका घेतली होती. पुढील निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट करून भाजप नेत्यांवर तसेच राज्यातील कारभारावर त्यांनी जोरदार टीका केली. शिवसैनिकांनाही तशाच सूचना दिल्या होत्या.युतीच्या माध्यमातून सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय ठाकरे यांनी घेऊन त्यांच्याच भूमिकेला तिलांजली दिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांना मानणारे जे सच्चे शिवसैनिक आहेत, त्यांच्याबद्दल मला व राष्ट्रवादीला सहानुभूती वाटते. उद्धव ठाकरे यांची ही भूमिका दुतोंडी सापासारखी आहे. त्यामुळे त्यांना शोभेल अशी ही व्यंगचित्राची प्रतिमा आम्ही भेट देत आहोत. त्यांनी खुल्या दिलाने ती स्वीकार करावी, असे चव्हाण यांनी म्हटले आहे.

तसेच राष्ट्रवादीच्या अधिकृत ट्विटर पेजवर देखील युतीसंदर्भात नाराजी असलेल्या पोस्ट पाहायला मिळत आहेत. एका पोस्टमध्ये

”सेनेचा बाण कमळाबाईच्या हृदयी रुतला

निवडणुका जवळ येताच युतीचा प्रश्न सुटला” !

अशा शब्दात शिवसेनेला टोला लगावला आहे. तसेच युती बाबत एक व्यंगचित्र देखील रेखाटले आहे . ज्यात एका दुचाकीचे चाक उद्धव ठाकरे यांच्या हातात आहे तर दुसरे चाक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आहे.

https://twitter.com/NCPspeaks/status/1097536027256856576