Pune News : फसवणूक प्रकरणी नगररचना सह संचालक नाझीरकर यांच्यासह 6 जणांविरूध्द बारामतीमध्ये FIR

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – फळविक्रेत्यांची अवाजवी रक्कमेची नोटरी करारनामा करत फसवणूक केल्या प्रकरणी नगररचना सहसंचालकासह सहा जणांवर बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे. हनुमंत नाझीरकर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या नगररचना सहसंचालकाचे नाव आहे. उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता बाळगल्याप्रकरणी यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नाझीरकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. रविवारी (दि.27) फळे विक्रीचा सुमारे दोन कोटी 90 लाख रुपयांचा खोटा दस्ता करारनामा करत फसवणूक केल्या प्रकरणी नाझीरकर यांच्यासह सहा जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाजीद छोटु बागवान (वय-55 रा. म्हाडा कॉलनी, बारामती) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी राहूल शिवाजी खोमणे, हनुमंत जगन्नाथ नाझीरकर, संगीता हनुमंद नाझीरकर, गीतांजली हनुमंत नाझीरकर (सर्व रा. शिरवली. ता. बारामती), सतीश भिकाराम वायसे (रा. अंजनगाव ता. बारामती), गुलाब देना धावडे (रा. सोमंथळी ता. फलटण) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसानी भादंवी कलम 417, 468,471,477,34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी बागवान यांच्या तक्रारी नुसार हा प्रकार 2011 ते नोव्हेंबर 2020 या कालावधीत घडला. बागवान यांनी आंबा आणि चिकु शिवाय कोणतेही फळे घेतली नाही. फळे खरेदीच्या व्यवहारापोटी केवळ प्रत्यक्षात 1 लाख 25 हजार रुपये दिले मात्र, त्यांच्याशी 74 लाख 40 हजार रुपयांची अवाजवी रक्कम स्टॅम्पवर, नोटरी व करारनामा करुन बागवान यांच्यासह इतरांची फसवणूक केली. तसेच इरफान युनुस बागवान यांच्या नावाने 3 लाख 50 हजार, युनुस बागवान यांच्या नावाने 1 कोटी 83 लाख, मोहंमद बागवान यांच्या नावाने 29 लाख असा 2 कोटी 90 लाख 73 हजार रुपयांचा स्टँम्पवर नोटरी करारनामा करुन चौघांची फसवणूक केली.

फिर्यादी हे शहरातील गुणवडी चौकात फळांचा स्टॉल लावून फळांची विक्री करतात. 2011 मध्ये ते फळ खरेदी साठी मार्केट यार्ड येथे गेले असताना त्यांची तोंडओळख असलेल्या राहूल खोमणे याने पणदरे खिंड येथील बागेतील चिक्कू 15 ऐवजी 12 रुपये किलो दराने देतो असे सांगितले. सुरुवातीला त्याने बागेतून दोन दिवस 500 किलो चिक्कू खरेदी केले. यानंतर आंबा खरेदीचा व्यवहार झाला. चिक्कू आणि आंब्याचा व्यवहार सव्वा लाखांचा झाला होता. त्यापोटी फिर्यादी यांनी दिलेले तीन चेक त्याने माघारी देण्यास टाळाटाळ करत आजपर्यंत ते चेक दिलेले नाही.

दोन दिवसांनी खोमणे याने 100 रुपयांच्या स्टँपवर काहीतरी लिहून आणले. फिर्यादी यांना वाचता येत नसल्याने त्यांनी याबाबत विचारणा केली. त्यावेळी त्याने फळे विक्रीचा मोठा व्यवसाय करतो, मला हिशोब ठेवावा लागते असे सांगत फिर्यादीसह इतर फळ विक्रेत्यांकडून करारनामा करुन घेयचा असल्याचे सांगून स्टँपवर सह्या घेतल्या.

यानंतर खोमणे हा नोव्हेंबर 2020 मध्ये फिर्यादी यांच्या घरी आला. त्याने स्टँपवर झालेल्या व्यवहारासंदर्भात कोणी चौकशी केली तर हा व्यवहार खरा असल्याचे सांगा, असे सांगून त्याने स्टँप देऊन निघून गेला. त्यानंतर एसीबीने नाझीररकर यांच्या चौकशीच्या अनुषंगाने फिर्यादी आणि इतरांकडे चौकशी सुरु केली. त्यावेळी त्याने आपल्या नावाने दोन कोटी नव्वद लाखांचा करारनामा झाल्याचे लक्षात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फळ विक्रेत्यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. नाझीरकर याच्यावर आजपर्यंत तीन गुन्हे दाखल झाले आहे. तसेच त्याच्या पत्नावर पुणे, बारामती आणि इतर ठिकाणी नऊ गुन्हे दाखल आहेत. तर त्याच्या मुलीवर चार गुन्हे दाखल आहे.