Solapur News : तिनं पाठवली मामाला Voice Clip, त्यानंतर आई-वडिलांवर झाला FIR दाखल

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – भाचीचा अल्पवयीन विवाह केल्याप्रकरणी मामानेच तरुणीच्या आई-वडिलांसह, नवरा व पाहुण्यांविरुद्ध पंढरपूर (Pandharupur) तालुका पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा नोंद केल्याची माहिती पोलीस निरीक्षक किरण अवचार यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील अल्पवयीन तरुणी मामाकडे राहायला होती. तिच्या आई-वडिलांनी मामाकडे घरी येऊन ‘आम्ही आमच्या मुलीस दोन दिवस तारापूर (ता. पंढरपूर) येथे घेऊन जातो’ असे सांगून नेले. त्यानंतर अल्पवयीन तरुणीने मामाच्या पत्नीच्या मोबाईलवर ‘मामा, माझे बळजबरीने घरातील लोक लग्न लावून देत आहेत. तुम्ही मला न्यायला या’ अशी व्हॉइस क्लिप पाठवली.

ही क्लिप ऐकल्यानंतर मामा तारापूर येथे गावी गेले. मात्र, तारापूर गावातील घरास कुलूप दिसले. मग मामाने अल्पवयीन मुलीच्या आई-वडिलांना फोन केला असता मोबाईल बंद लागला. त्यानंतर गुरुवारी (दि.७) तारापूर येथे घरी आल्यावर मामाने चौकशी केली असता आरोपींनी अल्पवयीन तरुणीचे लग्न केल्याचे म्हटले. माहिती मिळताच तात्काळ तरुणीच्या मामाने पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

फिर्यादीनुसार पोलिसांनी मुलीच्या आई-वडिलांसह, नवरा व सात पाहुण्यांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद केला. या प्रकरणाचा पुढील तपास पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण अवचार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.