लाच मागणाऱ्या सहायक पोलीस उपनिरीक्षका विरुद्ध गुन्हा दाखल 

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन-पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या धुळे तालुका पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उप निरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिपीन बाबुराव चौधरी (वय-५७) याचे विरोधात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

धुळे तालुका पोलीस ठाण्यात तक्रारदार (वय ४५) यांच्यावर गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यामध्ये तक्रारदार यांना मदत करण्यासाठी बिपीन चौधरी याने ४ नोव्हेंबर रोजी १० हजार रुपयांची लाच मागितली. याची तक्रार तक्रारदाराने धुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली होती. विभागाने पडताळणी करुन बुधवारी (दि.१४) चौधरी विरुद्ध धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्प लाईन क्रमांक किंवा ७८७५३३३३३३ या व्हॉट्स अॅप नंबरवर संपर्क साधावा.