डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण : तब्बल 7 वर्षानंतर CBI ला पिस्तूल शोधण्यात यश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करुन ते पिस्तुल ठाणे खाडीमध्ये टाकल्याचे सीबीआयने पकडलेल्या आरोपींनी सांगितले होते. सीबीआयला हे पिस्तुल शोधून काढण्यात यश मिळाले आहे. खारेगाव खाडीमध्ये सीबीआय ला हे पिस्तुल मिळाले आहे. त्याची आता फॉरेन्सिक तपासणी करण्यात येईल व त्यातूनच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करण्यात आली होती का याचा शोध घेतला जाणार आहे.

सीबीआयने सचिन अंदुरे याला अटक केल्यानंतर त्याने डॉ. दाभोलकर यांची हत्या केल्यानंतर वकिलांच्या सल्ल्यानुसार हे पिस्तुल ठाण्याच्या खाडीत फेकून दिल्याची माहिती दिली होती. त्यानंतर सीबीआयने अनेकदा खाडीत पिस्तुल शोधण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश आले नव्हते. शेवटी त्यांनी नॉर्वेच्या पाणबुड्यांचे सहाय्य घेतले. त्यासाठी अत्याधुनिक असे मशीन नॉर्वेहून मागविण्यात आले होते. त्याच्या सहाय्याने हे पिस्तुल शोधण्यात यश आले आहे. डॉ. दाभोलकर यांना मारण्यात आलेल्या गोळ्या याच पिस्तुलातून झाडण्यात आल्या होत्या का याची तपासणी आता होणार आहे.