चंद्रकांत पाटील यांच्याकडून केंद्राच्या इंधन दरवाढीचं समर्थन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात पेट्रोलवर २ रुपये ५० पैसे, तर डिझेलवर ४ रुपये कृषी अधिभार शुक्ल आकारण्यात येणार असल्याची माहिती दिली. त्याबद्दल बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, केंद्रातील योजनांसाठी पैसा कोठून आणायचा, असे म्हणत पेट्रोल डिझेलवर शुल्क लावून इंधन दरवाढीच्या केंद्र सरकारच्या भूमिकेचे त्यांनी समर्थन केले. इंधन दरवाढीने लोकांचे हाल होतील, यावरती त्यांनी बोलणे टाळले.

कोथरूड विधानसभा मतदारसंघासोबत शहरातील महत्वाच्या प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी पाटील यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पाटील म्हणाले, “पीककर्जासाठी सुमारे ७५ हजार कोटींची तरतूद केल्याने शेतकऱ्यांना कर्ज काढावे लागणार नाही. आरोग्य आणि पायाभूत सुविधांसाठी ४० हजार कोटींची तरतूद आहे. उद्योगांतील सवलतींमुळे लघुद्योगांना फायदा होईल.”

शरद पवार यांच्यावर टीका

कृषी विधेयकांबाबत राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आता चर्चेची अपेक्षा करीत आहे. पण, जेव्हा हे कायदे मंजूर झाले, तेव्हा ते संसदेत नव्हते. चर्चेसाठी त्यांनी राज्यसभेत हजर राहायला हवे होते, असा टोला पाटील यांनी हाणला.

नगरसेवक नाराज नाहीत

पुणे महापालिकेतील भाजपच्या काही नगरसेवकांच्या अडचणी आहेत. त्या ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रत्येक नगरसेवकाला भेटणार आहे. परंतु, भाजपचा एकही नगरसेवक नाराज नसल्याचे पाटील यांनी नमूद केले. भाजपचे नगरसेवक नाराज असल्याने कामांचे निमित्त करून पालकमंत्री अजित पवार यांना भेटत असल्याबाबत पाटील यांच्याकडे विचारणा केली. तेव्हा पाटील यांनी महापालिकेतील पदाधिकारी, त्यांचे काम, पक्षाच्या नगरसेवकांच्या अपेक्षा यावरती स्पष्टीकरण दिले.

यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर आदी उपस्थित होते.