तापमानाचा पारा घसरला, चंद्रपूर @ 10 अंश सेल्सियस

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – राज्यात गुलाबी थंडीचे आगमन झाले असून तापमानाचा पारा घसरत चालला आहे. सर्वाधिक कमी तापमान चंद्रपूर येथे १० अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले. दरम्यान, पुढील काही दिवस थंडीचा प्रभाव आणखी वाढेल आणि किमान तापमान एक आकडी नोंदविण्यात येईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

यंदा पावसाचे प्रमाण अधिक होते. तुलनेत थंडीही जास्त प्रमाणात पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. दिवाळीच्या आगमनालाच गुलाबी थंडीस सुरुवात झाली आहे. रविवारी तापमानाचा पारा घसरत चालला होता.

पुणे, जळगाव, महाबळेश्वर, मालेगाव, नाशिक, औरंगाबाद, परभणी, अकोला, गोंदिया, नागपूर, वाशिम आणि वर्धा येथील किमान तापमान रविवारी १५ अंशांखाली नोंदविण्यात आले, तर मुंबईचे किमान तापमान २३ अंशांच्या आसपास हाेते. शनिवारी मात्र मुंबई थेट १९ अंशांवर घसरली होती.