Pune : मैत्रिणीसोबत चालत जाणार्‍या महिलेचे 60 हजाराचे मंगळसूत्र हिसकावले

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – मैत्रिणीसोबत चालत निघालेल्या एका महिलेचा पाठलाग करुन सोन साखळी चोरट्यांनी गळ्यातील ६० हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना कोथरुड परिसरात घडली.

याप्रकरणी सुवर्णा रामदास सुरवसे (वय ३५, सुतारदरा, कोथरुड ) यांनी कोथरुड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुवर्णा आणि त्यांची मैत्रिण काल संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास म्हातोबानगर बसस्थानक परिसरातून रस्त्याने चालल्या होत्या. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांनी सुवर्णाच्या गळ्यातील ६० हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र हिसका मारुन तोडून नेले. सुवर्णा यांनी आरडा-ओरडा केला. पण तोपर्यंत दुचाकीस्वार चोरटे पसार झाले होते. अधिक तपास कोथरुड पोलिस करीत आहेत.