‘निवार’मुळे आंध्रप्रदेश, तामिळनाडु, पाँडेचरीला धोक्याचा इशारा ! विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची शक्यता

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘निवार’चक्रीवादळाचे (niwar-severe-cyclone) बुधवारी (दि. 25) तीव्र चक्रीवादळात रुपांतर झाले असून ते मध्यरात्री अथवा पहाटे तामिळनाडुच्या किनारपट्टीवर धडकणार आहे़. या पार्श्वभूमीवर आंध्रप्रदेश, तामिळनाडु, पाँडेचरीमध्ये धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच चक्रवादाळामुळे तामिळनाडु, पाँडेचरी परिसरातील काही भागाला अतिवृष्टीचा इशाराही दिला आहे. तर विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात शुक्रवारी पावसाची शक्यता वर्तवली आहे.

सध्या हे चक्रीवादळ पाँडेचरीपासून 190 किमी अंतरावर आहे. ते मध्यरात्री अथवा पहाटे कराईकल आणि ममल्ललापूरम दरम्यान किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे़. त्यामुळे तामिळनाडु, पाँडेचरी परिसरात काही ठिकाणी अतिवृष्टीचा होईल, असा इशारा दिला आहे. हे चक्रीवादळ जमिनीवर आल्यावर त्याचा जोर कमी होणार आहे. 26 नोव्हेंबरला त्याची तीव्रता कमी होऊन काही तासानंतर ते शांत होण्याची शक्यता आहे.

सध्या मध्य महाराष्ट्राच्या तुरळक भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे़ . त्याचवेळी विदर्भाच्या तुरळक भागात किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. विदर्भातील भंडारा जिल्ह्यात 26 नोव्हेंबर रोजी तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात 26 ते 27 दरम्यान तसेच वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात देखील याच दरम्यान वीजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. गोंदिया, वर्धा, नागपूर, बुलढाणा, अमरावती, अकोला जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पावसाची शक्यता आहे. सांगली, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद नांदेड, हिंगोली जिल्ह्यात गुरुवारी (दि. 26) पावसाची सुरुवात होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.