ठोको ताली ! इम्रान खानशी मैत्री महागात, कॉंग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून सिद्धू ‘गायब’

चंदीगड : वृत्तसंस्था – हरियाणा विधानसभा निवडणूकच्या प्रचारासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे, मात्र कॉंग्रेसमध्ये अजूनही सर्व काही आलबेल दिसत नाही. कॉंग्रेसने आपल्या स्टार प्रचारकांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये दोन आश्चर्यकारक गोष्टी आल्या आहेत. या यादीमधून नवज्योतसिंग सिद्धू यांचे नाव गायब आहे. तर विविध समित्यांचा राजीनामा दिलेले काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक तंवर यांचा राज्यातील स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.

हरियाणाच्या निवडणुकीमध्ये नवज्योतसिंग सिद्धू यांनी लक्ष घालू नये अशी काँग्रेसच्या नेत्यांची इच्छा आहे. सिद्धू यांनी पाकिस्तानात जाऊन लष्करप्रमुख बाजवा यांना मिठी मारली होती तसेच पंतप्रधान इम्रान खानची स्तुतीही केली होती. त्यामुळे नवज्योतसिंग सिद्धूच्या या कृतीमुळे लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी काँग्रेसवर टीकेची झोड उडवली होती. आता सिद्धू यांच्यामुळे कोणता वाद ओढवून घ्यायला नको अशी काँग्रेसच्या नेत्यांची भूमिका आहे. म्हणून यावेळी स्टार प्रचारकांच्या यादीत नवज्योतसिंग सिद्धू यांचे नाव वगळण्यात आले आहेत.

अशोक तंवर यांचे यादीत नाव –
या यादीतील दुसरी आश्चर्यकारक बाब म्हणजे आपल्या पक्षाने पाच कोटी रुपयांवर तिकीट विक्री केल्याचा आरोप करणारे कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक तंवर यांचा राज्यातील स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश झाला आहे. विशेष म्हणजे अशोक तंवर यांनी तिकिट वितरणात आपल्या समर्थकांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल नाराजी व्यक्त करत विधानसभा निवडणुकीसाठी बनविलेल्या विविध समित्यांचा गुरुवारी राजीनामा दिला आहे .

अशोक तंवर यांनी केले होते पक्षावर आरोप
हरियाणा कॉंग्रेस आता ‘हुड्डा कॉंग्रेस’ बनत असल्याचा आरोप अशोक तंवर यांनी केला. तंवर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की त्यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिले होते की त्यांना समित्यांमधून मुक्त करावे आणि ते सामान्य कार्यकर्त्याप्रमाणेच पक्षासाठी काम करत राहतील. हरियाणामध्ये विधानसभा निवडणुका आहेत. गेल्या पाच वर्षांच्या घटना सर्वांसमोर आहेत. पक्षात अशी काही लोक आहेत जी सतत पक्षाला कमकुवत करतात. त्यांनी नेत्यांना काम करण्यापासून रोखले होते. निवडणुकीसाठी बनविलेल्या राज्य निवडणूक समितीसह अनेक समित्यांमध्ये त्यांचा सहभाग होता.