पुण्यातील विधानसभेच्या ८ ही जागा भाजपच्याच : प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – ज्या जागा आपल्याकडे नसतात त्या जागांवर दावा करायचा असतो. पुण्यातील आठही जागा भाजपकडे असून या जागांवर दावा कसला करायचा असे सांगत पुण्यातील सर्व जागा भाजपच्याच असल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील स्पष्ट केले. जागा वाटपांबाबत निर्णय उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस घेतील. बाकीचे लोक काय म्हणतात याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज नाही असे म्हणत त्यांनी शिवसेनेचे तानाजी सावंत यांना टोला मारला. पुण्यात झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते.

मुख्यमंत्री पदाचा वाद उद्धव ठाकरे आणि भाजपाचे श्रेष्ठी सोडवतील तानाजी सावंत यांना गांभिर्याने घेण्याची गरज नसल्याचे सांगून आम्ही फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनाच गांभीर्याने घेतो असा टोला लगावला. मित्र पक्षांनी आम्हाला धमकी देऊ नये, सत्तेचा माज उतरवण्याची धमक शिवबंधनात असल्याचे तानाजी सावंत यांनी पिंपरी चिंचवडमध्ये म्हटले होते. त्यावर उत्तर देताना चंद्रकांत पाटील बोलत होते.


तर विधानसभा निवडणूक लढविणार…

आगामी विधानसभा निवडणूक लढवणार का असा प्रश्न विचारला असता त्यांनी, पक्षाने आदेश दिला तर विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिला. चंद्रकांत पाटील यांनी आत्तापर्यंत थेट निवडणूक कधीच लढविलेली नाही. चंद्रकांत पाटील कायम विधानपरिषदेच्या माध्यमातून आमदार झाले आहेत.

शरद पवारांनी कधी पाच जिल्ह्यातून निवडणूक लढली का ?

आपण जनतेतून निवडून येत नाही असे शरद पवारांनी अनेकदा सांगितले आहे. मात्र, ते एकाच मतदारसंघातून निवडून येतात. मी पाच जिल्ह्यांच्या पदवीधर मतदारसंघातून विधानपरिषद लढलाे. शरद पवारांना पाच जिल्ह्यातून लढता आलं का ? असा टोला त्यांनी शरद पवारांना लगावला. चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा लढवून दाखवावी, असे आव्हान शरद पवारांनी चंद्रकांत पाटलांना केले होते. त्यावर त्यांनी आज भाजपाच्या मेळाव्यात प्रत्युत्तर दिले.

आरोग्यविषयक वृत्त