…अन् संजय राऊतांनी घेतली फडणवीसांची गळाभेट, चंद्रकांत पाटील म्हणाले – ‘दुष्मन असला तरी तो त्या जागी’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – रविवारी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या मुलीचा साखरपुडा पार पडला. यावेळी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना देखील आमंत्रित केले होते. यावेळी संजय राऊत यांनी फडणवीस यांची गळाभेट घेतली. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय.

संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या या गळाभेटीसंदर्भात चंद्रकांत पाटील म्हणाले, आपल्या देशाची संस्कृती आहे, दुष्मन जरी असला तरी तो त्या नावाच्या जागी. एरवी आपण एकमेकांना प्रेम देतो. त्यामुळे संजय राऊत यांच्या मुलीच्या साखरपुड्याला देवेंद्र फडणवीस यांनी जायला हवे होते. स्वाभाविकपणे दोन मित्र भेटल्यानंतर त्यांचे राजकीय विचार वेगळे असले तरीही, .. म्हणून आपण प्रेमाने मिठी मारतोच.

अशी झाली राऊत – फडणवीस यांची भेट
खासदार संजय राऊत यांची मुलगी पूर्वशी हिचा साखरपुडा ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचा मुलगा मल्हार यांच्याशी झालाय. या कार्यक्रमाला विधानसभा विरोधीपक्ष नेते फडणवीस आणि विधानपरिषद विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, हे सोबत पोहोचले. यावेळी नार्वेकर यांनी देवेंद फडणवीस यांना नमस्कार केला. फडणवीस यांनी मल्हार आणि पूर्वशी यांना पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या. त्याच वेळी दुसर्‍या बाजूला असलेले खासदार संजय राऊत फडणवीस यांकडे आले आणि त्यांची गळाभेट घेतली.

या भेटीदरम्यान संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या चेहर्‍यावर हास्यही दिसून आले. यानंतर मल्हार आणि पूर्वशी यांच्यासोबत नार्वेकर व राऊत कुटुंबियांसह फडणवीस यांनी फोटो काढले. यानंतर दरेकर यांनी मल्हार आणि पूर्वशीला शुभेच्छा दिल्या.