चंद्रकांत पाटील यांची गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर टीका, म्हणाले – ‘तर तुम्हीही बदनामीकारक मजकूर ट्विटमध्ये वापरला नसता’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   भाजपच्या वेबसाईटवर रावेरच्या भाजप खासदार रक्षा खडसे यांचा आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आला. तसेच भाजपच्या अधिकृत वेबसाइटवर महाराष्ट्रातील भाजपा खासदार रक्षा खडसे यांचे असे अपमानजनक वर्णन पाहून मला धक्का बसला आहे. अशा प्रकारे महिलांचा अवमान करणाऱ्यांची महाराष्ट्र सरकार गय करणार नाही. भाजपने दोषींवर तत्काळ कार्यवाही करावी. अन्यथा महाराष्ट्र सायबर सेल पुढील कारवाई करेल, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. या प्रकरणावरून अनिल देशमुख यांनी आपल्या ट्विटमध्ये मूळ ट्विटमधील आक्षेपार्ह मजकूर वापरल्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गृहमंत्र्यावर टीका केली आहे.

चंद्रकांत पाटील ट्विट करत म्हणाले, गृहमंत्रीजी. महिला सन्मानाचा कळवळा असता तर तो बदनामीकारक मजकूर तुम्ही ट्विटमध्ये वापरला नसता, अशी टीका त्यांनी केली आहे. तसेच याच्यामागे कोण आहे हे भाजपा नक्कीच शोधून काढेल व कारवाई करेल. मात्र गृहमंत्रीजी, तुम्हाला खरंच महिला सन्मानाचा इतका कळवळा असता, तर असा बदनामीकारक मजकूर आपण कधीच ट्विटमध्ये वापरला नसता, असेही ट्विटमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे.

तर, खासदार रक्षा खडसे यांनी या प्रकाराचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. अशा गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल होता कामा नये. हा एका महिलेशी संबंधित प्रश्न आहे. चौकशीतून तथ्य समोर येईलच, असं रक्षा खडसे यांनी म्हटलं आहे. तसेच कोणत्याही महिलेच्या विरुद्ध कुणी असे आक्षेपार्ह टाकत असेल तर त्याची चौकशीच नव्हे तर त्याला शिक्षा दिली गेली पाहिजे. कारण महिलेचा सन्मान ठेवणारे आमचे राज्य आणि देशही आहे. त्यामुळे असा चावटपणा करणाऱ्याला आतमध्ये टाकायला हवे, अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते आणि राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा, स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली आहे.