लोकसभा निवडणुकीत ‘बारामती’मध्ये तळ ठोकणारे चंद्रकांत पाटील पुण्याचे नवे ‘पालकमंत्री’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत बारामतीत तळ ठोकणारे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची पुण्याच्या पालकमंत्री पदी वर्णी लागली आहे. तर जळगावचे पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर गिरीश बापट यांचे अन्न व औषध प्रशासन खाते जयकुमार रावल यांच्याकडे देण्यात आले आहे. त्यासोबतच विनोद तावडे हे संसदिय कामकाज मंत्री म्हणून काम पाहतील. अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांनी केली आहे.

लोकसभा निवडणूकीत पुण्याचे पालकमंत्री व अन्न औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट पुण्यातून निवडून आले. त्यानंतर पुण्याला पालकमंत्री नव्हता. पुण्यात शरद पवारांना शह देण्यासाठी एखाद्या मातब्बर नेत्याची पुण्याच्या पालकमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नेमणूक करण्यात येणार असल्याची चर्चा होती. त्यावेळी पुण्याच्या पालकमंत्रीपदी भाजपातील इतर नेत्यांची नावे चर्चेत होती. विखे पाटील यांनादेखील भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर शरद पवारांना शह देण्यासाठी पालकमंत्री करण्यात येणार असल्याची चर्चा होती. परंतु त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर पुण्याच्या पालकमंत्री पदासाठी आमदार बाळा भेगडे यांचेदेखील नाव चर्चेत होते. परंतु ऐनवेळी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुख्य़मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज याची घोषणा केली. चंद्रकांत पाटील पुण्याचे तर गिरीश महाजन जळगावचे पालकमंत्री असतील. त्यासोबतच गिरीश बापट यांच्याकडे असलेले अन्न व औषध प्रशासन खाते जयकुमार रावल यांच्याकडे देण्यात आले आहे. तर संसदिय कामकाज खाते विनोद तावडे यांच्याकडे देण्यात आले आहे. मात्र यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तारही केला जाणार असल्याचे सुतोवाच मुख्यमंत्र्यांनी केले.