ऑनलाइन गॅस बुकिंग करणं पडलं महागात, 1 लाख 4 हजारांची फसवणूक

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – गॅसबुकिंग करण्यासाठी गुगलवर सर्च केल्यानंतर एका अज्ञातव्यक्तीने फोन करून त्याना लिंक पाठवत 1 लाख 4 हजार रुपयांना गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. दोन दिवसांपूर्वी हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी 24 वर्षीय व्यक्तीने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे खरडी परिसरात राहण्यास आहेत. त्यांना गॅस बुकिंग करायचा होता. त्यामुळे त्यांनी गॅस एजन्सीचा क्रमांक गुगलवर सर्च केला. त्यावेळी त्यांना एका अज्ञात क्रमांकावरून फोन आला.

तसेच त्यांना एक लिंक पाठवून त्यावर माहिती भरण्यास सांगितले. फिर्यादी यांनी माहिती भरल्यानंतर त्यांच्या खात्यावरून यूपीआयच्या माध्यमातून 4 हजार 500 रुपये ट्रान्सफर केले. यानंतर दुसऱ्यादिवशी फिर्यादी याना त्यांच्या मोबाइलवर खात्यातून 99 हजार 900 रुपये ऑनलाइन ट्रान्सफर झाला असल्याचा एसएमएस आला. त्यावेळी त्यांना फसवणूक झाली असल्याचे लक्षात आले. त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. यानंतर अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास चंदननगर पोलीस करत आहेत.