मागितले टँकर आणि छावण्या, दिले डान्सबार आणि लावण्या : छगन भुजबळ

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसची निर्धार परिवर्तन यात्रा जळगावमध्ये पोहचली आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी डान्सबार बंदीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. आपण मागत होतो टँकर आणि छावण्या, पण चालू झाल्या डान्सबार आणि लावण्या, शासनाची धोरणे आहेत गाईला वाचवा आणि बाईला नाचावा, अशी डायलॉगबाजी करत भुजबळ यांनी शासनाच्या धोरणांवर टीका केली.

सरकार किती हुशार, त्यांचे वकील किती हुशार, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामावर बंदी घातली आणि डान्सबारवरील बंदी उठली. महाराज बंद – डान्सबार चालू, गाईला वाचवा आणि बाईला नाचवा, पुन्हा छमछम बार हे आमचं बीजेपी सरकार, अशी खोचक टीका भुजबळांनी यावेळी केली.

याच सभेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका केली आहे. या जिल्ह्यात एक मंत्री आहेत, जे आता सुपारी मंत्री म्हणून प्रसिद्ध आहेत.ते सुपारी घेतात आणि महानगरपालिका जिंकतात धुळे, जळगाव, अहमदनगर, नाशिक या पालिका त्यांनी पैशांच्या जोरावर जिंकल्या, असं जयंत पाटील यांनी म्हटलं.

दरम्यान या सभेला जळगावकरांचा तसा चांगला प्रतिसाद मिळाला नाही. सभेत बऱ्याच खुर्च्या रिकाम्याच दिसत होत्या. जळगावकरांनी सभेला पाठ फिरवली असली तरी निवडणुकीला कोणाच्या बाजूने कौल देतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.