मनचिंतन, मतचिंतन काय हवे ते करा; ग्रामपंचायत निकालावरून भुजबळांचा भाजपला टोला

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल आनंद देणारे आहेत. राज्य पातळीवर झालेली तिन्ही पक्षांची आघाडी तळागाळातील जनतेने स्वीकारली आहे असा याचा अर्थ आहे. या निकालावरून मी विरोधकांवर टीका करणार नाही. त्यांनी निकालाचा अभ्यास करावा. मनचिंतन, मतचिंतन काय हवे ते करावे,’ अशी मिश्किल टिप्पणी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.

नाशिकमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यातील 12 हजारांहून अधिक ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी महाविकास आघाडीने वरचष्मा राखला आहे. अनेक जिल्ह्यात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचा वा या पक्षांच्या पुरस्कृत पॅनलचा दबादबा राहिला आहे. तर, विरोधी पक्ष भाजपच्या दिग्गज नेत्यांना आपल्याच गावात पराभवाचा दणका बसला आहे. या निकालावर मंत्री भुजबळ यांनी प्रतिक्रिया देताना भाजपला टोला हाणला आहे.

औरंगाबाद नामांतरावर भुजबळ म्हणाले…सरकार अडचणीत येईल एवढा वाद ताणू नका
गेल्या काही दिवसांपासून राज्यात औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा गाजत आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना व काँग्रेस या सत्ताधारी पक्षांमध्येच यावरून कलगीतुरा सुरू आहे. त्यावरही भुजबळ यांनी आपले मत मांडले आहे. ‘सरकार अडचणीत येईल एवढा हा वाद ताणला जाऊ नये. जनतेचं हित डोळ्यासमोर ठेवून काम करण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत हे दोन्ही पक्षांनी लक्षात ठेवावे, असा सल्ला भुजबळ यांनी शिवसेना व काँग्रेसला दिला आहे.