मोदींच्या आव्हानाला चिदंबरम यांचे उत्तर

वृत्तसंस्था : गांधी कुटुंबाबाहेरील एखाद्या व्यक्तीला पाच वर्षांकरिता काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष करुन दाखवावे, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका कार्यक्रमादरम्यान केले होते. आता मोदींनी दिलेले हे आव्हान काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी स्वीकारत पलटवार केला आहे. मोदींची स्मरणशक्ती कमजोर आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. चिदंबरम यांनी काँग्रेसच्या १५ बिगर नेहरु-गांधी अध्यक्षांच्या नावांची यादीच त्यांनी वाचून दाखवली व मोदी आता राफेल करार, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या मुद्यावर उत्तर द्यावे, असे नवे आव्हान दिले आहे.

काय म्हणाले होते मोदी
छत्तीसगड येथे शुक्रवारी झालेल्या एका निवडणूक प्रचार सभेत मोदींनी काँग्रेसला आव्हान दिले होते. नेहरु-गांधी कुटुंबाबाहेरील एखाद्या योग्य व्यक्तीला पाच वर्षांसाठी पक्षाध्यक्ष बनवा, असे म्हटले होते. त्यानंतर चिदंबरम यांनी सलग ट्विट करत अध्यक्षांची नावेच सांगितली. तसेच काँग्रेसला स्वातंत्र्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लालबहादुर शास्त्री, के कामराज आणि मनमोहन सिंग यांसारख्या सामान्य पार्श्वभूमीचे नेते आणि स्वातंत्र्यापूर्वीच्या हजारो नेत्यांवर गर्व असल्याचे ते म्हणाले.

असे आहे चिदंबरम यांचे ट्विट
मोदींवर निशाणा साधताना ते म्हणाले, मी मोदींचे आभार मानतो. कारण काँग्रेस अध्यक्ष कोणाला निवडले जाते याची त्यांना चिंता आहे. त्यांच्याकडे यावर बोलायला भरपूर वेळ आहे. ते नोटाबंदी, जीएसटी, राफेल आणि आरबीआयबाबत बोलण्यासाठी याचा अर्धा वेळ तरी देतील का असा सवालही विचारला.शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी, मॉब लिचिंग, महिला आणि मुलींवरील बलात्कार, गो रक्षक आणि वाढते दहशतवादी हल्ल्यांवरही मोदी बोलतील का ? असे त्यांनी म्हटले.