दिल्लीतील Lockdown मुळे राज्यातही मोठा निर्णय? विजय वडेट्टीवारांचे संकेत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी देशभरातील अनेक राज्यांनी कठोर निर्बंध घातले आहेत. मात्र याचा म्हणावा तसा परिणाम होताना दिसत नाही. त्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोठा निर्णय घेतला असून पूर्णत: लॉकडाऊनची घोषणा केली आहे. दिल्लीसारखीच महाराष्ट्राची स्थितीही गंभीर आहे. त्यामुळे राज्यातही लॉकडाऊन लागणार का? यावर चर्चा सुरु आहे. यावर मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आता स्पष्ट संकेत दिले आहेत. दिल्लीतील परिस्थिती पाहून मुख्यमंत्री सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतील अशी माहिती त्यांनी दिली आहे.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ठाकरे सरकारने 1 मेपर्यंत संचारबंदीची घोषणा केली आहे. पण या संचारबंदीचा अपेक्षित फायदा होत नाही. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन मुख्यमंत्री सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतील असे ते म्हणाले. तसेच दिल्लीतील लॉकडाऊन पाहिल्यानंतर निर्णय घेतला जाईल. कोरोनाच्या लढाईसाठी सरकारने 5 हजार कोटींची तरतूद केल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.