एका कारणाचा शोध, ‘या’ स्वतंत्र देशावर ‘तात्काळ’ कब्जा करेल आमचं सैन्य : चीन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनच्या कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित असलेल्या ग्लोबल टाईम्स या वृत्तपत्राने उघडपणे कबूल केले आहे की, सैन्य तैवान ताब्यात घेण्याचा सराव करत आहे. चीन सरकारचे मुखपत्र मानल्या जाणाऱ्या या वर्तमानपत्राने म्हटले आहे की, शुक्रवारी लढाऊ विमानांचा केलेला सराव कोणतीही चेतावणी देण्यासाठी नव्हता, तर तैवानवर कब्जा करण्यासाठी सर्व होता.

शुक्रवारी चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) तैवानजवळ लढाऊ विमाने उडवली. सकाळी ७ च्या सुमारास विमानांची ये-जा सुरू झाली होती. एकावेळी अनेक बाजूंनी चीनची लढाऊ विमाने उडाली आणि तैवानजवळ पोहोचली. वृत्तपत्रानुसार, तैवानच्या संरक्षण विभागाने चीनची १८ विमाने उड्डाण केल्याची माहिती दिली आहे.

ग्लोबल टाईम्सचे म्हणणे आहे की, चिनी सैन्य अजूनही प्रतिबंधित आहे. पण जेव्हा अमेरिकेचा एखादा उच्च अधिकारी तैवानला जातो, तेव्हा चिनी सैनिकी युद्ध विमाने ‘एक पाऊल’ पुढे जातात. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री तैवानला आल्यास चिनी सैन्याने देशावरून विमान उडवले पाहिजे.

ग्लोबल टाईम्सचे म्हणणे आहे की, केवळ एका राजकीय कारणाची आवश्यकता आहे, जेणेकरून तैवानची स्वतंत्र सत्ता नष्ट होऊ शकेल. तैवानच्या अधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका कायम ठेवल्यास अशी परिस्थिती नक्कीच येईल.

चिनी वृत्तपत्राने लिहिले की, अमेरिका आणि तैवानमधील युतीबाबत चीनचा आक्षेप आहे. ग्लोबल टाईम्सचे म्हणणे आहे की, अमेरिकन अधिकारी कीथ जे. कराच यांच्या तैवानच्या दौऱ्याविषयी कोणतीही माहिती नव्हती. (कीथ जे. कराच गुरुवारी तैवानमध्ये दाखल झाले होते.) असे असूनही अगदी अल्पावधीतच चिनी सैन्याने युद्ध विमाने तयार करून पाठवली. म्हणजे चिनी सैन्य कोणत्याही वेळी तैवान ताब्यात घेण्यासाठी सज्ज आहे.

चिनी वृत्तपत्राचे म्हणणे आहे की, अमेरिका आणि तैवानने परिस्थितीबद्दल चुकीचे मत तयार करू नये. चिनी सैन्याच्या सरावाला त्यांनी दिखावा समजू नये. ते त्यांच्या वतीने चिथावणी देत राहिल्यास नक्कीच युद्ध होईल. ज्यांनी अलीकडेच चीनच्या दृढनिश्चयाला कमी लेखले आहे, त्यांना किंमत मोजावी लागली आहे.

चीनने अलीकडेच हाँगकाँगमध्ये राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू केला आहे, ज्यामुळे त्यांना तेथे बरीच शक्ती प्राप्त झाली आहे. त्याचबरोबर ग्लोबल टाईम्स वृत्तपत्राने लिहिले आहे की, तैवान एक छोटी जागा आहे. त्यांच्याकडे सैन्याशी सामना करण्याची स्थिती नाही. तैवानच्या स्वातंत्र्याचा एक अंत आहे.