चीन अनियंत्रित सत्तेमुळे संपूर्ण जगाचा शत्रू झालाय, जिनपिंग यांना घराचा आहेर

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोना विषाणूच्या प्रसारावरून अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलियासारख्या देशांनीही चीनला जबाबदार धरले आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी. जिनपिंग यांना आता देशातून आणि आपल्याच पक्षातून विरोधाचा सामना करावा लागत आहे. जिनपिंग यांच्या हाती अनियंत्रित सत्ता असल्याने चीन जगाचा शत्रू बनल्याचा आरोप सेंट्रल पार्टी स्कूलमधून निलंबित करण्यात आलेल्या प्राध्यापक कायी शिया यांनी केला आहे.

चीनमधील धनवान आणि वरिष्ठ अधिकार्‍यांच्या प्रशिक्षणासाठी सुरू करण्यात आलेल्या सेंट्रल पार्टी स्कूलच्या माजी प्राध्यापक कायी शिया यांनी जिनपिंग यांच्यावर आरोप केले आहेत. त्यांची धोरणे देशाचा सर्वनाश करत आहेत. चीनचे राष्ट्राध्यक्ष हे सेंट्रल पार्टी स्कूलचे अध्यक्ष असतात. अशा परिस्थिती कायी शिया यांची टीका महत्त्वपूर्ण मानली जात आहे. जिनपिंग यांच्यावर केलेल्या टीकेनंतर कम्युनिस्ट पार्टी ऑफ चीनने कायी शिया यांना निलंबित केले आहे. यामागे एक कथित ऑडियो रेकॉर्डिंग असल्याचे म्हटले जात आहे. यातील आवाज हा कायी शिया यांचा असून त्यांनी त्यात जिनपिंग यांच्यावर टीका केली आहे. कायी शिया यांनी सुरक्षेच्या कारणास्तव चीन सोडले आहे. त्यांच्या टीकेमुळे देशाच्या प्रतीमेला नुकसान पोहोचले असून त्यामुळे गंभीर राजकीय समस्याही निर्माण झाल्याचं सेंट्रल पार्टी स्कूलकडून सांगण्यात आले आहे.