Corona Virus : चीन सरकार 20000 कोरोनाग्रस्तांना मारणार ? जाणून घ्या वास्तव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमध्ये सध्या कोरोना व्हायरसच्या प्रकोपाने हाहाकार उडाला आहे. या जीवघेण्या व्हायरसने आतापर्यंत 600 पेक्षा जास्त लोकांचा बळी घेतला असून सध्या 30 हजारपेक्षा जास्त लोकांना कोराेना व्हायरसचा संसर्ग झाल्याचे वृत्त आहे. या व्हायरसची दशहत संपूर्ण जगभरात दिसून येत आहे. या प्रकोपाचा मोठा फटका बसलेल्या चीनमध्ये सध्या एका वृत्ताने मोठी खळबळ उडाली आहे. ते वृत्त म्हणजे चीन सरकारने सुप्रीम पीपल्स कोर्टाकडे कोरोना व्हायरसने पीडित 20 हजार रूग्णांना ठार मारण्याची परवानगी मिळण्यासाठी याचिका दाखल केली आहे. मात्र, सोशल मीडियावर पसरत असलेल्या या बातमीची खातरजमा केली असता सत्य वेगळे असल्याचे दिसत आहे.

कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या 20 हजार रूग्णांची सामुहिक हत्या करण्यासाठी चीन सरकारने कोर्टाकडे परवानगी मागितल्याच्या या वृत्ताला कोणत्याही एजन्सीने दुजोरा दिलेला नाही. हे वृत्त 5 फेब्रुवारी, 2020 रोजी, एबी-टीसी उर्फ सिटी न्यूज या वेबसाइटने प्रसिद्ध केले होते. यात दावा केला होता की, चीन प्रशासन कोरोना व्हायरसने पीडित असलेल्या 20 हजार लोकांच्या सामुहिक हत्येसाठी कोर्टाकडे परवानगी मागण्याच्या तयारीत आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग इतरांना होऊ नये यासाठी हा निर्णय घेतला असल्याचा दावा या वेबसाइटने केला होता.

या वृत्ताची खातरजमा करण्यासाठी चीनच्या सुप्रीम पीपल्स कोर्टाची वेबसाइट तपासली असता अशा कोणत्याही याचिकेचा उल्लेख तेथे आढळून आलेला नाही. वेबसाईटच्या दाव्यात कोणत्याही प्रकारचा पुरावा अथवा बातमीचा स्रोत दिलेला नाही. यापूर्वीही या वेबसाइटने चुकीची वृत्ते दिली आहेत. त्यामुळे ही बातमी विश्वासार्ह आहे, असे म्हणता येणार नाही. जुलै 2010 मध्ये या वेबसाईटवर न्यूयॉर्क जायंट्सचे प्रशिक्षक पॅट शुरुमर यांचे निधन झाल्याचे वृत्तही या वेबसाइटने दिले होते. परंतु, ते आजही जिवंत आहेत. त्यामुळे कोरोना व्हायरसबाबत या वेबसाइटने केलेला दाव्यात तथ्य नसल्याचे म्हटले जात आहे. ही बतमी सोशल मीडियातील अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सध्या कोराना व्हायरसचा चीनमधील प्रकोप सुरूच आहे. आतापर्यंत चीनच्या वुहान शहरापासून सुरू  झालेल्या कोरोना विषाणूचा संसर्ग जगभर वेगाने पसरत आहे. चीनमध्ये या व्हायरसमुळे आतापर्यंत 636 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणू सीफूड मार्केटमधून नव्हे, तर चीनच्या प्रयोगशाळेतून पसरला असल्याचे काही अहवालांमध्ये म्हटले आहे. दरम्यान, चीनमध्ये या व्हायरसने मृत्युमुखी पडलेल्यांची सरकारी आकडेवारी खोटी असून खरी संख्या खुपच भयावह असल्याचे म्हटले जात आहे.