राष्ट्रपती, पंतप्रधानांसह हजारो भारतीय चीनच्या हेरगिरीचे लक्ष्य

पोलिसनामा ऑनलाईन टीम – देशातील विविध क्षेत्रांतील नामवंतांच्या हालचालींवर झेनुआ कंपनीची पाळत ठेवत असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. त्यामध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री, प्रमुख विरोधी पक्षनेते, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि सरन्यायाधीश यांच्यासह सुमारे 10 हजार अतिमहत्त्वाच्या भारतीयांच्या हालचालींवर चीनस्थित एक मोठी डिजिटल तंत्रज्ञान कंपनी पाळत आहे.

चीन सरकार आणि कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित असलेल्या कंपनीचे मुख्यालय शेन्झेन शहरात आहे. ही कंपनी केवळ महत्त्वाच्या आणि अतिमहत्त्वाच्या राजकीय नेत्यांवरच नजर ठेवून नाही, तर अनेक राजकीय संस्था आणि उद्योगांवरही ती हेरगिरी करीत आहे. राजकारण ते उद्योग आणि न्यायव्यवस्था ते माध्यम या यंत्रणांवरही ही कंपनी हेरगिरी करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. इतकेच नव्हे तर भारतातील सर्व क्षेत्रांतील गुन्हेगारांचा तपशीलही या कंपनीकडे आहे.

राजकीय व्यक्तींव्यतिरिक्त संरक्षणदल प्रमुख बिपिन रावत यांच्यासह 15 माजी लष्करप्रमुख, नौदलप्रमुख आणि हवाई दलप्रमुख, सरन्यायाधीश शरद बोबडे, न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर, लोकपाल पी. सी. घोष, भारताचे महालेखा परीक्षक (कॅग) जी. सी. मुर्मू यांच्या हालचालींची नोंदही ‘झेनुआ’ कंपनी ठेवत असल्याची माहिती हाती आली आहे. त्याचबरोबर उद्योगपती रतन टाटा आणि गौतम अदानी यांच्यासह ‘भारत पे’ या ‘अ‍ॅप’चे संस्थापक निपुण मेहरा आणि ‘अर्थब्रिज’चे अजय त्रेहान आदी नवउद्यमींवरही ही चिनी कंपनी हेरगिरी करीत असल्याचे आढळले आहे.

राजकारण आणि प्रशासकीय यंत्रणांतील केवळ प्रभावशाली व्यक्तींवरच नव्हे तर जवळपास सर्वच महत्त्वाच्या भारतीयांवर ‘झेनुआ’ कंपनी लक्ष ठेवून आहे. त्यांत महत्त्वाच्या पदांवरील अधिकारीवर्ग, न्यायमूर्ती, शास्त्रज्ञ, अभ्यासक, संशोधक, पत्रकार, कलाकार, खेळाडू, आध्यात्मिक गुरू आणि सामाजिक कार्यकर्ते यांचाही त्यांत समावेश आहे.