हॉटेल व्यावसायिकाचा खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन दोषी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – हॉटेल व्यावसायिक बी. आर. शेट्टी यांचा खूनाचा प्रयत्न करणाऱ्या अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याला मुंबईच्या एका विशेष न्यायालयाने दोषी ठरवले आहे. छोटा राजनसह इतर सहा आरोपींना देखील या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. दोषी ठरवण्यात आलेल्या आरोपींनी ऑक्टोबर २०१२ मध्ये हॉटेल व्यावसायिक बी. आर. शेट्टी यांच्यावर हल्ला करून त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केला होता.

छोटा राजनविरोधात सध्या सुरू असलेल्या खटल्यांसाठी स्थापन केलेल्या विशेष मोक्का न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. छोटा राजनसह सर्व आरोपींवर षडयंत्र रचणे, खूनाचा प्रयत्न करणे आणि हॉटेल व्यावसायिक शेट्टी याच्यावर गोळीबार करून खून करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपांमध्ये दोषी ठरवण्यात आले आहे. याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

काय आहे प्रकरण ?
बी. आर. शेट्टी हे मुंबईतील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक आहेत. ३ ऑक्टोबर २०१२ रोजी रात्री पावणे दोनच्या सुमारास ते आपल्या कारमधून लिंक रोडने जात होते. त्यावेळी पाठिमागून दोन दुचाकीवरून आलेल्या गुन्हेगारांनी त्यांच्या गाडीला ओव्हरटेक करून त्यांची गाडी आडवली. त्यानंतर त्यांच्यावर बेछूट गोळीबार करून आरोपी तेथून फरार झाले. घटनेच्यावेळी शेट्टी स्वत: कार चालवत होते. गोळीबारामध्ये त्यांच्या खांद्याला एक गोळी लागून ते जखमी झाले होते. जखमी अवस्थेत त्यांना धीरूभाई अंबानी कोकिला बेन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

याप्रकरणी शेट्टी यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली. तपासादरम्यान शेट्टी यांच्यावर हल्ला करणारे हे अंडरवर्ल्डचे लोक असल्याची माहिती समोर आली. या प्रकरणाचा तपास सुरु असताना अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याचे नाव समोर आले. दरम्यान छोटा राजन याच्यासह पोलिसांनी सहा जणांना अटक करून त्यांच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

आरोग्यविषयक वृत्त