विखेंच्या भेटीसाठी निघालेल्या मनसेच्या नगरसेवकाचे सिनेस्टाईल अपहरण

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – शिर्डी नगराध्यक्षपद निवडणुकीला चांगलेच गालबोट लागले आहे. भाजप खासदार सुजय विखे यांच्या भेटीसाठी दिल्लीला निघालेल्या नगरसेवक तथा पाणीपुरवठा समितीचे सभापती दत्तात्रय कोते यांचे सिनेस्टाईल अपहरण करण्यात आले. अपहरणकर्त्यांचे मोबाईलवर एकाशी संभाषण झाल्यानंतर ब्राह्मणी गावच्या शिवारात मध्यरात्रीच्या सुमारास सोडून देण्यात आले. याप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून अपहरणकर्त्यांचा शोध सुरू आहे. शिर्डीत झालेल्या गुंडागर्दीने पोलिसांनी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

याबाबत माहिती अशी की, शिर्डीत नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होत आहे. यासाठी विखे समर्थकांनी तीन अर्ज नेले आहेत. सोमवारी सकाळी शिर्डी नगरपंचायतीचे नगरसेवक तथा पाणीपुरवठा सभापती दत्तात्रय कोते यांची खासदार सुजय विखे यांच्यासोबत चर्चा झाली होती. निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी विखे यांनी त्यांना भेटण्यासाठी मंगळवारी सकाळी दहा वाजता दिल्लीत येण्यास सांगितले होते. त्यानुसार दत्तात्रय होते हे पहाटेच्या सुमारास पुणे विमानतळावरुन दिल्लीला जाणार होते. त्यासाठी सोमवारी रात्री ते इनोव्हा कारमधून पोपट शिंदे, अंजाबापू गोल्हार यांच्यासमवेत पुणे विमानतळावर चालले होते. बाभळेश्वर जवळील हॉटेल ग्रीन पार्क येथे मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास आईस्क्रीम घेण्यासाठी कार थांबविली. शिंदे व गोल्हार हे दोघे आईस्क्रीम घेण्यासाठी गेले असताना इनोव्हाजवळ एक इंडिका व्हिस्टा कार थांबली. सदर व्हिस्टा कारमधून तीन जण उतरले. त्यांनी नगरसेवक दत्तात्रय कोते यांना ढकलून कारच्या मागील सीटवर ढकलून दिले. त्यानंतर पिस्तुलाचा धाक दाखवून निघून गेले. त्यांनी रोख रक्कम, मोबाईल हँडसेट व कागदपत्रे काढून घेतले. त्यानंतर नगरच्या दिशेने गाडी घेऊन आले.

राहुरीपासून दहा-बारा किलोमीटर अंतरावर शिंगणापूर कमानीतून आत गेले. त्यावेळेस रस्त्याने गेल्यानंतर कार थांबवण्यात आली. कारच्या बाहेर चालक जाऊन कोणाशी तरी फोनवर बोलला. त्यानंतर कार चार-पाच किलोमीटर अंतरावर नेली. तिथे गेल्यानंतर चालकाने तू वाचलाच तुला येथेच सोडून देतो, असे म्हणाला. त्यानंतर ब्राह्मणी गावच्या शिवारात सोडून दिले. पहाटे चार वाजेपर्यंत एका पंक्चर दुकानासमोर नगरसेवक कोते बसले. चार वाजता रस्त्याने जाणारा एक टँकर चालकाच्या फोनवरून मित्राशी संपर्क साधला व मित्राला ब्राह्मणी बस स्टॉपवर भेटण्यासाठी बोलवले. सकाळी सव्वासहा वाजता मित्र भेटण्यासाठी आला. ते दोघे लोणीत गेले. तेथून पोलीस ठाण्यात गेले.

याबाबत नगरसेवक दत्तात्रय कोते यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तींविरुद्ध अपहरण व भारतीय हत्यार कायद्यानुंसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांच्या वर्णनावरून त्यांची रेखाचित्र तयार करण्यात आली आहेत. त्याआधारे आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
आरोग्य विषयक वृत्त –
या’ घरगुती उपायांनी काळ्या ओठांना बनवा मऊ आणि गुलाबी
पाठदुखी का होते ? जाणून घ्या कारणे, करा हे उपाय
‘या’ गोष्टी फॉलो करा आणि निकालाचे नैराश्य घालवा
या ‘शॉर्टटर्म’ व्यायाम प्रकारांचे अनुभवा ‘लॉंगटर्म’ फायदे