पोलीस अधिकाऱ्याची बदली केल्याने नागरिकांचा पाच तास रास्ता रोको

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – हुपरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षकाची बदली जयसिंगपूर येथे झाल्याने सहा गावांतील नागरिकांनी बुधवारी पोलीस ठाण्यासमोरच रास्ता रोको आंदोलन केले. या अधिकाऱ्याचे नाव नामदेव शिंदे असून त्यांची बदली रद्द करण्याची मागणी नागरिकांनी डीवायएसपी निलाभ रोहन यांच्याकडे केली. तसेच मागणीचे निवेदनही देण्यात आले. आपल्या मागणीसाठी तब्बल पाच तास भरउन्हात रास्ता रोको आंदोलन केले.

जाहिरात

सपोनि शिंदे यांनी हुपरी पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी हुपरीसह परिसरातील पट्टणकोडोली, रेंदाळ, तळंदगे, इंगळी, यळगूड या गावांतील कायदा व सुव्यवस्था निर्माण केली. ज्येष्ठ नागरिक, शालेय मुला-मुलींना आणि तरुण मंडळ कार्यकत्र्यांना एकत्रित करून गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी पुढाकार घेतला. याचबरोबर स्वच्छता अभियान, विविध सामाजिक उपक्रम राबवले. त्यांच्या अशा कामांमुळे अल्पावधीतच त्यांचा दबदबा निर्माण झाला होता. कर्तव्य दक्ष, कडक शिस्तीमुळे हुपरीसह परिसरातील सामाजिक वातावरणही चांगले झाले होते. मात्र, शिंदे यांची बदली झाल्याची माहिती नागरिकांना सोशल मीडियाद्वारे समजताच सहाही गावांतील लोकांनी हुपरी पोलीस ठाण्याच्या आवारात गर्दी केली. शिंदे यांची बदली रद्द करावी, अशी मागणी करत पोलीस ठाण्यासमोरच रास्ता रोको आंदोलन केले. रस्ता बंदची माहिती समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी, इचलकरंजी विभाग यांनी घटनास्थळाला भेट देऊन नागरिकांना समजावण्याचा प्रयत्न केला; मात्र कोणीच समजण्याच्या मन:स्थितीत नव्हते. अखेर शिंदेंनाच घटनास्थळावर बोलवण्यात आले. जमलेल्या जमावाने तुम्हाला आम्ही जाऊ देणार नाही, अशी एकच ठाम भूमिका मांडल्याने तेही त्याबाबत हतबल झाले. शिंदे यांना जमलेल्या जमावाने उचलून धरत घोषणा दिल्या. याप्रकारामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनाही आश्चर्य वाटले. एखादा पोलीस अधिकारी आपल्या कार्याने नागरिकांच्या मनातही घर करू शकतो, हेच यातून दिसून आले आहे.

Loading...
You might also like