नीरेतील नागरिकांची रविवारी ‘होम-टू-होम’ आरोग्य तपासणी होणार

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन –  पुरंदर तालुक्यातील नीरा येथील नागरिकांचे कोरोणा संसर्गाच्या पार्श्वभुमीवर रविवारी (दि.१३) होम टू होम तपासणी सर्व्हे करण्यात येणार असून नागरिकांनी घरातच थांबून सर्व्हेक्षणास येणा-या पथकास सहकार्य करावे असे आवाहन पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी केले आहे.

पुण्याचे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापण प्राधिकरण, पुणे यांनी कोरोणा संसर्ग जन्य रोगाचे प्रतिबंध उपाययोजना करणेसाठी जास्त बाधित ग्रामपंचायत क्षेत्रात व नगरपालिका क्षेत्रात प्रभावी सर्व्हेक्षण व तपासणी करणेबाबतचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार पुरंदरच्या प्रशासनाकडून
ग्रामपंचायत क्षेत्रात व नगरपालिका क्षेत्रात स्थानिक संपर्काने बाधित होण्याचे प्रमाण वाढले असल्याने सर्व नागराकांची होम टू होम तपासणी करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

पहिल्या टप्प्यामध्ये नीरा व वाल्हा ग्रामपंंचायत क्षेत्रात तसेच सासवड व जेजुरी नगरपालिका क्षेत्रात अँक्टिव्ह सर्व्हिलन्स राबविण्यात येणार आहे . रविवारी (दि.१३) नीरा व वाल्हा या ग्रामपंंचायत क्षेत्रामध्ये होम टू होम तपासणी सर्व्हे पुर्ण करण्याची तयारी प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे.

सर्व्हेक्षण पथकामार्फत नीरा व वाल्हा ग्रामपंचायत क्षेत्रातील १०० टक्के नागरिकांची रविवारी (दि.१३) सकाळी आठ वाजलेपासून होम टू होम तपासणी करून प्रत्यक्ष कुटूंबांचा सर्व्हे पुर्ण करण्यात येणार आहे. यासाठी ४५ लोकांचे पथकांमार्फत होम टू होम प्रत्येक नागरिकांचे आँक्सिजन, पल्स रेट व शरीरातील तापमानाची तपासणी करण्यात येणार आहे. त्यामध्ये ९५ टक्क्यांपेक्षा आँक्सिजन लेवल कमी असणाऱ्या नागरिकांची अँन्टिजेन टेस्ट संबंधित गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात येणार आहे.
दरम्यान, नीरा व वाल्हा येथील नागरिकांनी रविवारी ( दि.१३) घरातच थांबुन सर्व्हेक्षणासाठी येणा-या पथकास सहकार्य करावे असे आवाहन पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी केले आहे.