सणासुदीच्या काळात ‘कोरोना’चा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी : अजित पवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   सणासुदीच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी नागरिकांनी नवरात्र, दसरा, दिवाळी या सणादरम्यान गर्दी करु नये, तसेच सामाजिक अंतर राखणे, हात धुणे व मास्क वापरणे ही खबरदारी घ्यावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

मोरया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल संचलित साई स्पंदन हॉस्पिटल, हडपसर व कोविड केअर सेंटर चे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव तसेच साई स्पंदन हॉस्पिटलचे डॉ.अजितसिंह पाटील, डॉ.समीर ननावरे, वरिष्ठ अधिकारी व हॉस्पिटलचे डॉक्टर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेंतर्गत घरोघरी सर्व्हेक्षणावर भर देऊन प्रशासन बधितांना वेळेत उपचार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहे. तसेच मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. गणेशोत्सव काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून आले. सध्या काही प्रमाणात कोरोना बधितांचे प्रमाण नियंत्रणात येत आहे. परंतु नवरात्र व सणाच्या कालावधीत देखील नागरिकांनी दक्षता बाळगून स्वतः ची व कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केले.

साई स्पंदन हॉस्पिटलमध्ये 25 बेडची सोय आहे. यातील 5 आयसीयू बेड, 20 ऑक्सिजन बेड आहेत. या हॉस्पिटलमध्ये कोविड तपासणी युनिट, 24 तास अत्यावश्यक सेवा, रुग्णवाहिका व मेडिकल सुविधा, ऑपरेशन थिएटर, एक्स रे व रक्त लघवी तपासणी आदी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत, असे सांगून या हॉस्पिटलने रुग्णसेवेचा वसा जोपासावा, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.