मुख्यमंत्र्यांचे आश्वासन ; ‘मुंढे साहेबांचे ते स्वप्न पूर्ण करू’

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याचं स्वप्न दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी पाहिलं होतं. त्यामुळे गोदावरीत पाणी आणून संपूर्ण मराठवाड्याला दुष्काळमुक्त करु, असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं आहे. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पाचव्या स्मृती दिनी आज गोपीनाथ गडावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महिला आणि बालविकास कल्याण मंत्री पंकजा मुंढे आदी उपस्थित होते. गोदावरीच्या खोऱ्यातून पश्चिम वाहिन्या नद्यांचे पाणी समुद्रात वाहून जाते. ते पाणी नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्यात आणले जाणार आहे. या संबधीचा प्लॅन तयार आहे. मराठवाड्यातील सगळी धरणे पाईपने जोडून पिण्याचे पाणी प्रत्येक ठिकाणी पोहचवण्याची वॉटर ग्रीड योजनेला मंजुरी दिली आहे. इस्राईलसोबत करार करून हे काम केलं जाणार आहे. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.

मुंढे साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवत पंकजा मुंढे आणि प्रीतम मुंढे यांनी साहेबांचा राजकारणाचा वारसा जपला आहे. असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.