राज्यातील विभागीय आयुक्त कार्यालयांमध्ये मुख्यमंत्री सचिवालय कक्ष सुरु

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या घोषणेनुसार राज्यातील सर्व विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष सुरु करण्यात आला आहे. प्रशासकीय कामात लोकाभिमुखता, पारदर्शकता आणि गतिमानता आणण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान घेतला होता. त्यानंतर अवघ्या काही दिवसांत हा कक्ष सुरु करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या घोषणेनुसार पुण्यात विभागीय स्तरावर मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापन करण्यात आला आहे. नागरिकांकडून मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात येणारे अर्ज किंवा निवेदने ही पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात सुरु झालेल्या कक्षात स्विकारली जाणार असून, त्यावर झालेल्या कार्यवाहीचा अहवालही प्रत्येक महिन्याला नागरिकांना पहायला मिळणार आहे. पुण्यातील या कक्षाचे उद्घाटन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

सर्वसामान्य माणसाला त्याचे दैनंदिन आणि स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी आपले गाव, शहर सोडून मुंबईला यावे लागू नये, त्यांचा वेळ पैसा आणि श्रम वाचावेत या हेतूने हे कक्ष सुरु करण्यात आले आहेत. त्याचबरोबर क्षेत्रिय पातळीवरचे प्रश्न क्षेत्रिय स्तरावरच सुटावेत, या प्रक्रियेला वेग मिळावा ही त्यामागची भूमिका आहे. आता सर्व विभागीय आयुक्त कार्यालयात हे कक्ष सुरु झाल्याने सर्वसामान्य माणसाला दिलासा मिळणार आहे.

या कक्षात आलेले अर्ज निवेदने संबंधित क्षेत्रिय स्तरावरील यंत्रणेकडे योग्य कार्यवाहीसाठी त्वरित पाठवले जाणार असून, लोकशाही दिनाच्या दिवशी या अर्ज आणि निवेदनांवर नेमकी काय कार्यवाही झाली याचा आढावा घेण्यात येईल. नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी या विभागस्तरावरील कक्षामुळे गतिमानता येईल. विभागाचे महसुल आयुक्त हे यासाठी विशेष कार्य अधिकारी म्हणून काम पाहतील. शिवाय एक नायब तहसीलदार, एक लिपिक आणि एक लिपिक टंकलेखक हेही या कक्षात काम करतील.

फेसबुक पेज लाईक करा –