मुख्यमंत्र्यांनी दिलं भाजप प्रदेशाध्यक्षांना खास ‘गिफ्ट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी मंडळींना कोंडीत पकडण्याची एकही संधी विरोधकांनी सोडली नाही. शिवसेना-भाजप पाच वर्षे सत्तेत होते. मात्र सत्तापरिवर्तन झाले आणि शिवसेना सत्ताधारी बाकावर व भाजप विरोधक बाकावर आले. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना खास गिफ्ट दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे .

पहिल्या दिवसापासून विरोधक विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत आहे. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, अवकाळी पाऊस यावरून विरोधक सत्ताधारी पक्षाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आहेत. मुख्यमंत्र्यासमोर घोषणाबाजी झाल्यावर चंद्रकांत पाटील आमदार लाॅबी मध्ये आले. त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवर्जून खाण्याच्या गोळ्या दिल्या. तुम्ही विरोधी बाकावर आहात, घसा कोरडा पडू नये म्हणून आवर्जून घ्या असा सल्ला मुख्यमंत्री ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांना दिला. यापूर्वी आम्ही विरोधी बाकावर असताना आमचे आमदार खाण्याच्या गोळ्या घेत अशी आठवण याच अधिवेशनात उपमुखमंत्री अजित पवार यांनी सांगितली होती. यानंतर मुखमंत्र्यांनी चंद्रकांतदादांना गोळ्या दिल्याने याची चर्चा आमदार लॉबीत रंगली.

दुसऱ्या बाजूला, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी सर्व पक्षांचे नेते उपस्थित होते. ‘मुख्यमंत्री म्हणून बोलण्याची संधी आणि वेळ तुमच्यामुळे आली’ असा टोला मुखमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांना पुस्तक प्रकाशनच्या कार्यक्रमात लगावला होता. तसेच पुढील ५-१० वर्षे तुम्ही पुस्तकच लिहा असा सल्लाही यावेळी दिला होता.

याची विधिमंडळात चर्चा सुरु असताना भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधले. ‘सहकारातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हे सर्वांना चकवा देणारे आहेत. त्यांच्याशी फार नाद करू नका. तुम्ही भाजपच्या विचारांचे आहात परत एकदा मागे या.. परत या.. परत या..’ अशी साद मुनगंटीवार यांनी विधानसभेत घातल्याने सभागृहात परत एकदा ठाकरे आणि भाजप चर्चा रंगली.