CM ठाकरेंचा ठाणे दौरा वादग्रस्त ठरण्याची शक्यता ? शिवसेना नगरसेवकांची राजीनाम्याची ‘धमकी’

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – ठाण्यात खेळाच्या मैदानाचे आरक्षण हटवून त्यावर सायन्स पार्क उभारले जाणार आहे. या सायन्स पार्कचे भूमीपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज होणार असून जर हे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांनी केले तर आम्ही राजीनामा देऊ अशी धमकी ठाण्यातील शिवसेनेचे नगरसेवक  उषा भोईर, देवराम भोईर, संजय भोईर, आणि भूषण भोईर यांनी दिलीय. मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवून प्रशासन हा प्रकल्प राबविणार असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे.

मुख्यमंत्री ठाकरेंच्या हस्ते ठाण्यात विविध प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण केले जाणार आहे. यातील ढोकाळी भागात 20 एकर सुविधा भुखंडावर खेळासाठी क्रिडागंणाचे आरक्षण टाकण्याचा प्रस्तावाची सूचना 2017 मध्ये मंजुर करण्यात आली होती. असे असतांना कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता पालिका प्रशासनाने त्याच जागेवर आता सायन्स पार्क अर्बन जंगल उभारण्याचा घाट घातला असून पालिका प्रशासन मुख्यमंत्र्यांना या विषयी अंधारात ठेवून त्यांच्या हस्ते भूमिपूजन करुन घेतय असा आरोपही त्यांनी केलाय.

क्लस्टर योजने अंतर्गत हे केलं जात असून काही नगरसेवकांचा गैरसमज झालाय. त्यांनी प्रशासनाशी चर्चा करावी असं ठाणे महानगर पालिका आयुक्त संजीव जैस्वाल यांनी स्पष्ट केलंय.

काँग्रेस नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी आरोप केला आहे की, आधी देखील पालिकेच्या या बिल्डर धार्जीणीधोरणामुळे मैदांनाकरिता आरक्षित असलेले भूखंड बिल्डरांच्या घशात घातले गेलेत, त्यामुळे मुलांसाठी एकही मैदान शिल्लक राहीले नाही. याशिवाय विवीयाना मॉल जवळील फायर स्टेशनसाठी आरक्षित असलेला भुखंडही पालिकेने परस्पर बड्या विकासला देऊन टाकला, असे नगरसेवक चव्हाण म्हणाले.