चीनपेक्षा मोठा असेल देशातील पहिला पाण्याच्या आतील ‘बोगदा’, 14.85 किमी असेल लांबी

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : आता अरुणाचल प्रदेश ते आसाम पर्यंतची रस्ते वाहतूक पूर्वीच्या तुलनेत अधिक मजबूत होईल. अरुणाचल प्रदेश ते आसाम पर्यंत रस्ते वाहतुकीला गती देण्यासाठी बोगदा बांधण्यास केंद्र सरकारने तत्वतः मान्यता दिली आहे. आता ब्रह्मपुत्रा नदीखाली 14.85 किमी बोगदा तयार केला जाईल.

नदीच्या खाली बांधलेला हा बोगदा सर्वात लांब बोगदा असेल. यापूर्वी पूर्व चीनमधील ताइहू तलावाखाली एक बोगदा बांधला जात होता. आसामच्या गोहपुर (एनएच-54) ते नुमालीगड (एनएच-37) ला जोडण्यासाठी ब्रह्मपुत्रा नदीखाली चार लेनचा रस्ता तयार करण्यास मान्यता देण्यात आली आहे. अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम नॅशनल हायवे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने बोगद्याच्या विस्तृत प्रकल्प अहवालास मान्यता दिली आहे.

हा बोगदा अमेरिकन कंपनी तयार करेल

अमेरिकेच्या लुईस बर्जर कंपनीने हा बोगदा तयार करण्यासाठी प्री-फिजिबिलिटी रिपोर्ट आणि डीपीआर तयार केला आहे. या बोगद्याचे वैशिष्ट्य म्हणजे यातून लष्करी वाहने आणि शस्त्रांस्त्रांनी सुसज्ज वाहने ताशी 80 किलोमीटर वेगाने धावतील. 2020 च्या डिसेंबरपासून हा बोगदा तयार करण्याचे काम सुरू केले जाईल. बोगद्याच्या आत हवेचा दाब खूपच कमी असेल, यासाठी बोगद्याच्या आत ताज्या हवेसाठी व्हेंटिलेशन सिस्टीम, फायर फायटिंग, प्रकाश व्यवस्था आणि आपत्कालीन बाहेर पडण्याची सुविधादेखील तयार केल्या जातील.