‘आमचा म्हैसूर पाक खाल्ल्याने ‘कोरोना’ बरा होतो’, जाहिरात करणार्‍या मिठाई दुकानाचा परवाना रद्द

पोलिसनामा ऑनलाईन – आमच्या दुकानातील म्हैसूर पाक खाल्यास कोरोना बरा होतो असा दावा करणार्‍या मिठाई दुकानदारावर कारवाई करण्यात आली आहे. भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) अन्न संरक्षण आणि सुरक्षा कायद्याअंतर्गत करावाई करण्यात आली आहे.

कोईम्बतूर येथील श्री राम नेल्लाई लाला स्वीट्स असे कारवाई करण्यात आलेल्या मिठाईच्या दुकानाचे नाव आहे. दुकानाचे मालक श्रीराम यांनी दुकानातील म्हैसूर पाक हा कोरोना बरा करु शकतो अशा माहितीची पत्रक वाटली होती. या पत्रकांमध्ये श्रीराम हे या औषधी म्हैसूर पाकचा फॉर्म्युला पंतप्रधान नरेंद्र मोदींना मोफतमध्ये सांगण्यास तयार असल्याचेही म्हटले होते. हा औषधी म्हैसूर पाक कोरोनाची लागण झालेल्यांना सुरुवातील थोडा कडू लागेल नंतर मात्र रोगप्रतिकारशक्ती वाढल्यानंतर तो गोड लागू लागले असाही दावा या पत्रकात करण्यात आला होता. आम्ही हा फॉर्म्युला सरकारला मोफत देण्यास तयार आहोत. आम्ही हा फॉर्म्युला मोदींना देऊ. केंद्राने स्थापन केलेल्या एखाद्या समितीबरोबर आम्ही वर्षभरासाठी मोफत काम करण्यास तयार आहोत, असे श्रीराम यांनी म्हटले आहे. ही जाहीरात व्हायरल झाली आणि एफएसएसएआयच्या नजरेत आली. त्यानंतर एफएसएसएआयचे कोईम्बतूरमधील आरोग्य सेवेचे सह निर्देशक आणि सिद्धा जिल्ह्याच्या आरोग्य अधिकार्‍यांनी श्रीराम यांच्या दुकानाला भेट दिली. या भेटीसंदर्भातील कल्पना जिल्हाधिकार्‍यांना आधीच देण्यात आली होती. तपासानंतर श्रीराम यांचा खाद्य विक्री परवाना रद्द करण्यात आला आहे.