अभिनेत्री कंगना राणावत विरोधात मुंबई पोलिसात तक्रार दाखल !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र सरकार आणि बॉलिवूड स्टार कंनगा राणावत यांच्यातील वाद वाढतच चालला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपमानास्पद भाषेचा वापर करणं तसेच त्यांची बदनामी केल्याचा आरोप करत कंगना विरोधात मुंबईतील विक्रोळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखळ करण्यात आली आहे. या तक्रारीसोबत कंगनाचे काही ट्विट जोडले आहेत. या तक्रारीत तिच्या एका व्हिडीओचा देखील उल्लेख आहे.

बुधवारी मुंबई महापालिकेनं कंगना रणौतच्या घर वजा कार्यालयावर धडक कारवाई केली. अवैध बांधकाम केल्याचा ठपका ठेवत महापालिकेनं ते उध्वस्त केलं होतं. त्यानंतर कंगनानं सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत नाराजी व्यक्त केली होती. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली होती. कंगनाची बहिण रंगोली हिनं गुरुवारी कार्यालयात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तिनं कार्यालयाचे काही फोटो आणि व्हिडीओ देखील काढले. यानंतर कंगनानंही पुन्हा उद्धव ठाकरे सरकार विरोधात ट्विट करत टीका केली होती.

ॲड. नितीन माने यांच्या मार्फत विक्रोळी पोलीस ठाण्यात कंगनाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कलम 499 अंतर्गत तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा असं माने यांनी तक्रारीत म्हटलं आहे. कंगनानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत उद्धव ठाकरेंची बदनामी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

कंगनानं 9 सप्टेंबर रोजी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला असून तिनं मुख्यमंत्र्यांचा एकेरी भाषेत उल्लेख केला आहे. मुख्यमंत्र्यांबद्दल अपमानास्पद भाषेचा वापर केला असून तिनं जाणूनबुजून फिल्म माफियांसोबत संबंध जोडून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळं तिच्याविरोधात कलम 499 अंतर्गत गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी माने यांनी तक्रारी द्वारे केली आहे.