कॉ. पानसरे हत्या : अमोल काळेच्या पोलीस कोठडीत वाढ

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन- कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी अमोल अरविंद काळे ( रा. माणिक कॉलनी, पिंपरी -चिंचवड, पुणे) याच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने आज पुन्हा वाढ केली आहे. त्याला २९ नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने आज (गुरुवार) दिली आहेत. दरम्यान अमोल काळे याला मोठ्या पोलीस बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी वकील आणि आरोपीच्या वकिलांनी सुमारे तासभर युक्तिवाद केला.

संशयित काळे हा गौरी लंकेश हत्या प्रकरणात बेंगलोर येथे न्यायालयीन कोठडीत होता. महाराष्ट्र एसआयटीने बुधवारी (दि.१४) सायंकाळी कर्नाटकात न्यायालयीन कोठडीत असलेल्या अमोल काळेला ताब्यात घेतले. त्यानंतर गुरुवारी (दि.१५) त्याला कोल्हापुरात आणून सकाळी सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर एस. एस. राऊळ यांच्यासमोर हजर केले. यावेळी काळे याला कोल्हापूरच्या न्यायालयानं सात दिवसांची पोलीस कोठडी दिली होती. तपासा दरम्यान पोलीस कोठडीमध्ये काळे याने कोणतेही सहकार्य केले नसल्याची माहिती सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी न्यायालयात दिली. तसेच यासाठी अजून अग्निशस्त्र  प्रशिक्षण घेतलेले ठिकाण जालना आणि कर्नाटक असून पोलिसांना तिथं जाऊन तपास करायचा असल्याचं निंबाळकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

त्याबरोबरच या प्रकरणांमध्ये या हत्येमध्ये वापरलं गेलेलं अग्निशस्त्र हे मध्यप्रदेशमधून खरेदी केल्याचा संशय असल्याने तोही तपास करणे गरजेचे असल्याने आणखी सात दिवसाची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी न्यायालयात केली.

तर आरोपीचे वकील समीर पटवर्धन यांनी सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी केलेले मुद्दे खोडून  काढले. तसंच गेल्या ७ दिवसांत SIT ने एक टक्का सुद्धा तपास केला नसून SIT हा तपास करण्यात सक्षम नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

SIT ने केलेला तपास कॉपी पेस्ट केला असून अमोल काळे आणि वीरेंद्र तावडे हे कधीही एकमेकांना भेटलेले नाहीत त्यामुळं SIT प्रत्येक वेळी नवीन कहाणी बनवत आहे त्यामुळं काळे याला पोलीस कोठडी न देता न्यायालयीन कोठडी द्यावी असा युक्तीवाद आरोपीचे वकील समीर पटवर्धन यांनी न्यायालयात केला.दोन्ही बाजूच्या वकील यांनी केलेल्या युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने संशयित आरोपी अमोल काळे याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.