गोपनीय शाखा भजे खात होती की हप्ते गोळा करत होती; विखे पाटलांचा प्रश्न

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन

औरंगाबाद शहरात झालेल्या दंगलीबद्दल बोलताना विधानसभा विरोधी पक्षनेते यांनी खोचक शब्दात पोलिसांचा समाचार घेतला, शहरातील अनेक भागात दंगल उसळते, हे येथील इंटेलिजन्सचे अपयश असून पोलिसांची गोपनीय शाखा भजे खायला गेली होती की हप्ते गोळा करायला गेली होती, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज (रविवार) शहरातील शहगंज भागाची पाहणी केली. झालेल्या नुकसानाचा आढावाही घेतला, त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, शहरातील दंगल ही पूर्व नियोजित होती. या दंगलीची कमिश्नर ऑफ इन्क्वायरी अॅक्टनुसार चौकशी करण्‍याची मागणी त्यांनी केली. तसेच प्रक्षोभक भाषण करणारे सेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांवर घणाघात
राज्याचे मुख्यमंत्री हे हापटाईम तर गुन्हेगार फुलटाईम काम करत असल्याची टीका विखे पाटील यांनी सत्ताधारी सरकारवर केली. राज्याला गृहमंत्री नाही, तसेच मागील दोन महिन्यांपासून औरंगाबाद शहराला पोलिस आयुक्त नाही, याचा फायदा गुन्हेगारांनी घेतला आहे. याला राज्याचे मुख्यमंत्री जबाबदार असून त्यांनी नैतिक जबाबदारी स्विकारून त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विखे पाटील यांनी केली.शहरात जातीय तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. पोलिस अधिकार्‍यांचा संपूर्ण वेळ हा सत्ताधाऱ्यांची हाजी हाजी करण्यातच जात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सत्ताधार्‍यांच्या सांगण्यावरून पोलिस विरोधी पक्षांच्या नेत्यांची टेहाळणी करत आहेत.