काँग्रेसला धक्का : १५ आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत

अहमदाबाद :  वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यांनतर काँग्रेसमध्ये राजीनामासत्र सुरु झाले आहे. यात आणखीनच भर पडत असून आता, गुजरातमधील 15 काँग्रेसचे आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचा दावा ठाकूर सेनेचे प्रमुख व आमदार अल्पेश ठाकूर यांनी केला आहे. काँग्रेसमध्ये प्रत्येकजण नाराज आणि असमाधानी आहे. ‘पुढे पहा काय होते’ असा सूचक इशारा सुद्धा ठाकूर यांनी दिला. 2017 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून राधनपुर मतदार संघातून अल्पेश ठाकूर आमदार म्हणून निवडून आले होते.

लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेसमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. काँग्रेसमध्ये राजीनामे देण्याची मालिका सुरु झाली आहे. त्यातच, गुजरात मधील 15 नाराज आमदार काँग्रेसचा हात सोडणार असल्याचा दावा ठाकूर यांनी केला आहे. ठाकूर यांच्या दाव्याने काँग्रेसची मोठी डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. ज्याप्रकारे काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्व संभ्रमात आहे, त्याचे पडसाद गुजरातमध्ये उमटत असल्याचे ठाकूर म्हणाले.

लोकसभा निवडणुकीपूर्वीच ठाकूर काँग्रेसमधून बाहेर पडले होते. त्यांनतर ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा होती. ठाकूर यांनी सोमवारी गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांची भेट घेतली. यांच्या भेटीनंतर ठाकूर हे भाजपमध्ये जाण्याची चर्चा रंगली. मात्र ठाकूर यांनी, मी माझ्या परिसरातील पाण्याच्या समस्येसंदर्भात नितीन पटेल यांची भेट घेतली असल्याचा खुलासा केला. मी माझ्या लोकांसाठी काम करण्यास इच्छुक आहे. त्यासाठी सरकारच्या मदतीने चांगले कार्य केले जाऊ शकते असे ठाकूर म्हणाले.