नाना पटोले यांची घणाघाती टीका, म्हणाले – ‘फ्रान्समधील चौकशीतून चौकीदार ही चोर है हे आता सिध्द झालंय’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   कॉंग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी राफेल लढाऊ विमान खरेदीत प्रचंड मोठा घोटाळा झाल्याचे उघडकीस आणले होते. मात्र सातत्याने खोटे बोलून व बनावट कागदपत्रे दाखवून मोदी सरकारने या घोटाळ्यावर पांघरून घातले. परंतू राफेल खरेदी करारानंतर डसॉल्ट कंपनीने भारतीय मध्यस्थाला एक दशलक्ष युरोंची लाच दिल्याचे फ्रान्समध्ये सुरु असलेल्या चौकशीतून समोर आले असून चौकीदार ही चोर है हे सिद्ध झाल्याची घणाघाती टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे.

2016 मध्ये भारत आणि फ्रान्समध्ये राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीबाबत करार झाला होता. त्यानंतर डसॉल्टने भारतातील मध्यस्थाला एक दशलक्ष युरो एवढी रक्कम दिली. 2017 मध्ये डसॉल्ट ग्रुपच्या बँक खात्यातून ही रक्कम ट्रान्सफर झाली होती. फ्रान्समधील भ्रष्टाचारविरोधी तपास संस्था AFA ने डसॉल्टच्या बँक खात्यांचे ऑडिट केल्यानंतर ही बाब समोर आल्याचे पटोले म्हणाले. तसेच यावरून राफेल खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध झाले आहे. कॉंग्रेसने मागणी केल्याप्रणाणे या खरेदी कराराची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी केल्यास या प्रकरणाचे सत्य समोर येऊन खरे चोर सापडतील असे पटोले यांनी म्हटलं आहे.