धक्कादायक ! ‘कर्फ्यू’ दरम्यान काँग्रेस नेत्याचा गोळ्या घालून खून

जबलपूर : वृत्तसंस्था  – सध्या संपूर्ण देशामध्ये कोरोना व्हायरसची दहशत असून यामुळे अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. असे असताना मध्य प्रदेशात मात्र एका काँग्रेस नेत्याचा गोळ्या घालून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे राज्यात कर्फ्यू लावण्यात आल्याने सगळीकडे कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. असे असताना नेत्याचा गोळ्या घालून खून केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी घरात घुसून या नोत्यावर गोळ्या झाडल्या. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. धमेंद्र सोनकर असे या काँग्रेस नेत्याचे नाव असून ते काँग्रेसचे माजी नगरसेवक होते. या हल्ल्यात धमेंद्र यांच्या जवळून छातीवर, कंबरेत गोळ्या झाडण्यात आल्या. ते गंभीर जखमी होऊन खाली पडल्यानंतर हल्लेखोरांनी तेथून पळ काढला.

घटना घडली त्यावेळी धर्मेंद्र सोनकर हे आपल्या घराबाहेरच असलेल्या मंदिरात बसलेले होते आणि उपस्थित लोकांशी चर्चा करत होते. हल्ल्याची माहिती मिळताच नातेवाईकांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली. त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलीस अधिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर तात्काळ गोळी झाडणाऱ्या आरोपीची ओळख पटवण्यात आली. त्यानुसार पोलिसांची पथकं आरोपीच्या शोधात असताना एका पथकाला मोनू सोनकर या आरोपीला अटक केली आहे. हा हल्ला कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप समजू शकले नाही.