Video : ‘पंतप्रधानजी एकट्यानं बोगद्यात हात हलवणं सोडा, आपलं मौन तोडा, प्रश्नांना सामोरं जा !’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल टनेलचं उद्घाटन केलं आहे. हिमाचल प्रदेशातील रोहतांग खिंडीत खोदण्यात आलेल्या अटल बोगद्यामुळं भारताची सीमेवरील शक्ती वाढेल असं प्रतिपादन मोदींनी या बोगद्याचं उद्घाटन करताना केलं होतं. या बोगद्याच्या भूमी पूजनाच्या कार्यक्रमावेळी बोगद्यात गेल्यानंतर मोदींनी नेहमीप्रमाणे हात उंचावून अभिवादन केलं. परंतु बोगद्यात कोणीही नसताना मोदींनी नेमकं कोणाला अभिवादन केलं असा सवाल राजकीय नेत्यांसह अनेकांनी केला आहे. मोदींचा हाच फोटो सोशलवरून शेअर करत अनेकांनी टीका केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही पीएम मोदींवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी व्हिडीओ शेअर करत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.

राहुल गांधी म्हणतात, “पंतप्रधानजी एकट्यानं बोगद्यात हात हलवणं सोडा, आपलं मौन तोडा. प्रश्नांना सामोरं जा. देश तुम्हाला खूप काही विचारत आहे.” असं राहुल गांधी म्हणाले आहेत. यावेली राहुल गांधी यांनी अनेक मुद्दे मांडले आहेत. हाथवर प्रकरणावर मोदींनी शब्दही काढला नाही असंही ते म्हणाले आहेत.

‘सत्य लपवण्यासाठी उत्तर प्रदेश प्रशासन अमानवीय प्रकार करतंय’
राहुल गांधी यांनी हाथरस प्रकरणावरून पुन्हा एकदा योगी सरकारवर जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी म्हणाले, “सत्य लपवण्यासाठी उत्तर प्रदेश प्रशासन अमानवीय प्रकार करतंय. ना आम्हाला, ना माध्यमांना पीडितेच्या कुटुंबीयांना भेटू दिलं. त्यांनाही बाहेर येऊ दिलं जात नाही. पीडितेच्या कुटुंबीयांना माराहण आणि त्यांच्यासोबत असभ्य वर्तन केलं जात आहे. कोणताही भारतीय अशा वागणुकीचं समर्थन करू शकत नाही.” असंही ते म्हणाले आहेत.